कोरेगाव भीमा, पेरणे परिसरात मद्य विक्रीस बंदी | पुढारी

कोरेगाव भीमा, पेरणे परिसरात मद्य विक्रीस बंदी

कोरेगाव भीमा (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत शिक्रापूर व लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीतील देशी, विदेशी दारू, वाईन, बियर, ताडी विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. सदर नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. यंदा विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी राज्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून सोयीसुविधांची तयारी केली जात आहे. यानिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

शौर्य दिन शांततेत व सुरळीत पार पडावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दि. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 1 जानेवारी पूर्ण दिवस शिक्रापूर व लोणीकंद पोलिस चौकी हद्दीतील सर्व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी देशमुख यांनी घेतला आहे. सदर आदेशाचे पालन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Back to top button