पुणे : पारंपरिक तेलबियांचे क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर ! | पुढारी

पुणे : पारंपरिक तेलबियांचे क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर !

पुणे : खेड कृषी उपविभागातून सरासरी 779 हेक्टर क्षेत्रावर पारंपरिक तेलबिया, करडई, तीळ, जवस आणि सूर्यफुलाची पेरणी केली जात होती. परंतु, गेल्या काही वर्षांत पारंपरिक तेलबियांचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांत केवळ 2.18 टक्केच म्हणचे अत्यंत नगण्य क्षेत्रावर घरगुती स्वरूपात पारंपरिक तेलबियांची पेरणी झाली आहे.

गेल्या काही वर्षांत मार्केटिंगच्या या युगात नियोजनबद्ध पध्तीने आपली पारंपरिक पिके नष्ट करून नगदी, कॅशक्रॉप घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. भारतात घरगुती वापरामध्ये पूर्वपार केवळ शेंगदाणा, करडई, तीळ, सूर्यफूल आदी तेलबियांचे तेल खाण्यासाठी वापरले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांत सोयाबीनचा एवढा प्रचंड प्रचार आणि प्रसार करण्यात आला की आपल्या हजारो शेतकर्‍यांनी आता करडई, तीळ, सूर्यफूल आणि भुईमुगाची लागवड करणेच सोडून दिले आहे.

बाजारामध्ये पाहिजे ते रिफाइंड तेल सहज उपलब्ध होत असल्याने आणि या सर्व पिकांचा एकरी खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने व भारतीयांच्या जेवणातील या पारंपरिक तेलाची जागा सोयाबीन व अन्य तेलांनी घेतल्याने मार्केटमध्ये देखील या पारंपरिक तेलबियांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत खेड उपविभागातून सूर्यफूल, करडई, तीळ पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुणे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात या पारंपरिक तेलबियांची खरीप आणि रब्बी हंगामात देखील लागवड केली जात होती.

पुणे खेड कृषी विभागातील चार तालुक्यांत सरासरी करडई 48.40 हेक्टर, तीळ तब्बल 378 हेक्टर क्षेत्रावर, जवस 120 हेक्टर क्षेत्रावर आणि सूर्यफुलाची 232 हेक्टर असे एकूण तब्बल 679 हेक्टर क्षेत्रावर या पारंपरिक तेलबियांची पेरणी केली जात होती. चालू रब्बी हंगामात आतापर्यंत यापैकी केवळ 17 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे केवळ दोन टक्केच क्षेत्रावर या तेलबियांची पेरणी झाली आहे. यामध्ये तीळ पिकाची शून्य टक्के पेर झाल्याची धक्कादायक वस्तुस्थिती कृषी विभागाच्या रब्बी पिकांच्या पेरणी अहवालानुसार स्पष्ट झाली आहे.

खेड उपविभागात सोयाबीनच्या क्षेत्रात 270 टक्के वाढ
खेड उपविभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांत सोयाबीनच्या क्षेत्रात तब्बल 270 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या चार तालुक्यांत सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 13 हजार 581 हेक्टर एवढेच असताना खरीप हंगामात उच्चांकी 36 हजार 798 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. ही वाढ तब्बल 270 टक्के एवढी आहे.

गेल्या काही वर्षांत शेतकर्‍यांचा पारंपरिक पिके घेण्याचा कल कमी होत आहे. बाजारात त्याला जास्त मागणी आणि भावही योग्य प्रमाणात मिळत असल्याने सोयाबीन पीक घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळेच जिल्ह्यातील पारंपरिक तेलबियांचे क्षेत्र कमी होत नाही.
                                                              – मनोजकुमार ढगे,
                                                      उपविभागीय कृषी अधिकारी

Back to top button