जुन्नर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा | पुढारी

जुन्नर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : शेताचे कुंपण तोडल्यामुळे विचारणा करीत असताना सहा जणांनी मिळून एकाला धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ करत हाकलून लावले. याप्रकरणी दाखल फिर्यादीनंतर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात दिलेल्या वेगळ्या तक्रारीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन चंद्रकांत कदम (रा. जुन्नर) यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी नीलेश तान्हाजी दुराफे, तान्हाजी केशव दुराफे, हृषीकेश दुराफे, विमल तान्हाजी दुराफे, हेमा नीलेश दुराफे आणि लक्ष्मण पोपट बोचरे (सर्व जण रा. कुसूर, ता. जुन्नर) यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अधिनियम कलमांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सचिन हे कुसूर येथील आपल्या शेतामध्ये गेले असताना त्यांना शेताचे कुंपण तोडलेले दिसले. याबाबत त्यांनी दुराफे कुटुंबाला विचारणा केली असता या सर्वांनी मिळून त्यांना धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ करून तेथून हाकलून लावले. दरम्यान 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेले संमतीपत्र व त्यामध्ये लिहिलेला मजकूर हा पूर्णपणे खोटा आहे.

खोटा अंगठा असलेले बनावट कागदपत्रे जोडून 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोदा दादाभाऊ बोचरे (रा. कुसूर, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन चंद्रकांत कदम (रा. जुन्नर) याच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

Back to top button