पुणे : अंगदुखी, सर्दी, ताप जाता जाईना ! दुपारी उन्हाचा चटका; उत्तररात्री झोंबणारी थंडी | पुढारी

पुणे : अंगदुखी, सर्दी, ताप जाता जाईना ! दुपारी उन्हाचा चटका; उत्तररात्री झोंबणारी थंडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वर्ष-सहा महिन्यांतून किमान एकदा  तरी भेट द्यायला येणार्‍या ताप, सर्दी, अंगदुखी अशी लक्षणे असलेल्या आजारांनी आता वर्षभर ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. हवामानात सातत्याने होणार्‍या बदलांनी ऋतूंची गणितेच बदलून टाकली आहेत. तापमानातील चढ-उतारामुळे आणि अचानक होणार्‍या बदलांमुळे शहर पुन्हा आजारी पडल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे आणि हवेचा दाब कमी झाला आहे.

साधारणपणे कमाल आणि किमान तापमानात दुप्पट किंवा तिप्पट फरक असतो. सध्या हा फरक खूप कमी झाल्याचे जाणवत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसवर स्थिरावत, तर किमान तापमान 17 ते 21 अंश सेल्सिअस इतके नोंदविले जात आहे. याचाच परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2030 ते 2050 दरम्यान हवामान बदलामुळे कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि उष्णतेच्या ताणामुळे दरवर्षी अंदाजे अडीच लाख अतिरिक्त मृत्यू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आपले शरीर कायमच हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, तापमानात मोठा बदल झाल्यास  आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण

सध्याचे वातावरण विषाणूंच्या वाढीस पोषक असल्याने विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यातच गोवर, झिका,
जॅपनीज इनसिफेलायटिस अशा आजारांनी चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषत: लहान मुलांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नये.

काय काळजी घ्यावी?

दूरचा प्रवास करताना शक्यतो तोंड,
नाक आणि कान झाकलेले असावेत.
डॉक्टरांनी पूर्वी दिलेली औषधे स्वत:च्या
मनाने सध्याच्या समस्यांवर घेऊ नयेत.
घसा खवखवत असल्यास दूध-हळद, आल्याचा चहा, गरम पाणी
यांचे सेवन करावे. व्हिटॅमिन ’ए’, ’सी’युक्त पदार्थांचा आहारात
समावेश करावा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा
यांचा समावेश असावा. असा आहार घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

सध्या सकाळच्या वेळी दमट हवा, दुपारी तीव— उष्णता आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका, असे विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. विषम हवेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये श्वसनाच्या समस्या, अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, डोकेदुखी अशा समस्या पाहायला मिळत आहेत. 3 किंवा 5 दिवसांच्या औषधोपचारांनी तब्येतीत सुधारणाही दिसून येत आहे.
                    – डॉ. मिलिंद काळे, जनरल फिजिशिअन, वारजे माळवाडी

गोवर (एमआर), न्यूमोनिया, रोटा व्हायरस, बूस्टर असे लसीकरण कोरोनामुळे मागे पडले असेल, तर ते वेळापत्रकानुसार पूर्ण करून घ्यावे. नवजात बाळाला बी. सी. जी., कावीळ आणि पोलिओ; दीड, अडीच आणि साडेतीन महिन्याला देण्यात येणार्‍या ट्रिपल, हिपेटायटिस बी, रोटा, न्यूमोनिया या लसी वेळापत्रकानुसार देण्यात याव्यात. सहा महिने पूर्ण झाल्यावर इनफ्लुएन्झा प्रतिबंधक लसीची दोन इंजेक्शन्स महिन्याच्या अंतराने देण्यात यावीत. नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळाला गोवर, गालगुंड, जर्मन गोवर ही लस द्यावी. बूस्टर लस दीड, पाच आणि दहाव्या वर्षी द्यावी.
                                      – डॉ. राजेंद्र पाटील, बालरोगतज्ज्ञ, विश्रांतवाडी

Back to top button