पुणे : शेतकर्‍यांनो; पीकविमा योजनेचा अर्ज भराच | पुढारी

पुणे : शेतकर्‍यांनो; पीकविमा योजनेचा अर्ज भराच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येत्या रब्बी हंगामातील विविध पिकांना विमासंरक्षण मिळण्याच्या हेतूने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना योजना ऐच्छिक आहे. पीकविमा योजना ही ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी भूईमूग, अशा विविध अधिसूचित पिकांसाठी आहे. खातेदारांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

शेतकर्‍यांना भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के, असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमासंरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही शेतकर्‍यांचे स्थैर्य अबाधित राखणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत.

….तर मिळेल विमासंरक्षण
पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीकपेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान, या स्थितीत विमासंरक्षण मिळणार आहे.

बँका, कृषी विभागाशी संपर्क साधा
पुणे जिल्ह्यासाठी पीकविमा योजनेकामी आयसीआयसीआय जनरल लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी पुणे ही काम पाहत असून, त्यांचा टोल फ्री क्रमांक 18001037712 आहे. शेतकर्‍यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा, विकास सोसायट्या आणि कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button