विनयभंग गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा; टापरेवाडीतील 2018 मधील घटना | पुढारी

विनयभंग गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा; टापरेवाडीतील 2018 मधील घटना

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील टापरेवाडी येथील एका 21 वर्षीय तरुणाने तीन वर्षांपूर्वी एका महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडित महिलेने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांचा तपास व घटनेतील साक्षीदारांची साक्ष तसेच युक्तिवाद ग्राह्य धरून त्याला न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा आणि 15 हजारांचा दंड ठोठावला आहे.

निखिल ऊर्फ नितीन रामचंद्र टापरे (रा. टापरेवाडी, ता. भोर) असे विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. 22 नोव्हेंबर 2018 मध्ये घडली होती. भोर न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती एच. यू. पाटील यांनी बुधवारी (दि. 23) भादंवि कलम 354 अन्वये एक वर्षाचा कारावास व 15 हजार दंड, अशी शिक्षा दिली असून, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात सरकारी पक्षाकडून सरकारी वकील श्रीमती व्ही. एस. पवार यांनी कामकाज पाहिले.

2018 मध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पीडित महिला गोठ्यात गाय बांधण्यासाठी जात असताना आरोपी निखिल ऊर्फ नितीन टापरे याने पीडित महिलेचा विनयभंग केला होता. याबाबत त्या वेळी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार रवींद्र कुलकर्णी यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

Back to top button