पुणे : तक्रारी गांभीर्याने घ्या, अन्यथा खैर नाही : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता | पुढारी

पुणे : तक्रारी गांभीर्याने घ्या, अन्यथा खैर नाही : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ’नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घ्या, विशेषः महिलांच्या तक्रारींच्या बाबत तत्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करा. पोलिस ठाण्यांत आलेल्या प्रत्येक नागरिकाला समाधान वाटले पाहिजे. त्यामुळे त्यांचे तक्रारीअर्ज शिल्लक ठेवून नका, योग्य तपास, चौकशी करून गुन्हे दाखल करा; अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आठवड्याच्या आढावा बैठकीत (डब्लूआरएम) दिला.  मंगळवारी आयुक्तालयात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या वेळी अपर पोलिस आयुक्त गुन्हे, प्रशासन, पोलिस उपायुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

श्वेता रानवडे खून प्रकरणाचे आढावा बैठकीत पडसाद उमटले. संबंधित तरुणीचा खून होण्यापूर्वी तिने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात प्रतीक ढमाले याच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला होता. मात्र, संबंधित तक्रार अर्जाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसून आले. त्यानंतर ढमाले याने श्वेताचा धारधार शस्त्राने वार करून खून केला. यानंतर त्यानेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी ज्या महिला पोलिस उपनिरीक्षकाकडे तपास देण्यात आला होता, त्यांना निलंबित करण्यात आले असून, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचीदेखील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार गंभीर असल्याचे सांगत सह पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सर्वांना फैलावर घेतले. तुमच्या बाबत जर अशी वेळ आली, तर तुम्ही हेच उत्तर देणार का, किंवा कारवाईमध्ये दिरंगाई करणार का, असा सवालच त्यांनी सर्वांना उपस्थित केला.

त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी कोणत्या अधिकार्‍याकडे किती तक्रार अर्ज प्रलंबित आहेत, याचा आढावा घेतला. सर्व तक्रार अर्जांचा निपटारा करण्यासाठी सात दिवसांची अधिकार्‍यांना मुदत देण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील आणि महिलांच्या संदर्भातील अर्जाचा तत्काळ निपटारा करा. जे कोणी निर्धारित वेळेत काम करणार नाहीत, त्यांची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केली जाईल, असेदेखील गुप्ता म्हणाले.

हॉटेलमध्ये गैरप्रकार घडल्यास उपायुक्त, पोलिस निरीक्षक जबाबदार

रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर नियमांना तिलांजली देत मद्यधुंद रात्र जागविणार्‍या हॉटेल व्यावसायिकांच्या बाबत पोलिस आयुक्त गुप्ता आणि सह पोलिस आयुक्त कर्णिक यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नागरिकांनी पोलिसांकडे टेरेसवरील हॉटेलसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन परिसरातील पब आणि हॉटेलमधील आवाज मर्यादेबाबत कारवाई करून साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले आहेत. संबंधित व्यावसायिकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींनी नियमांचे उल्लंघन करून आवाज मर्यादेचे नियम मोडणार्‍या सर्व पब आणि हॉटेलवर कारवाई करावी. तसेच, टेरेसवर सुरू असलेल्या व इतर हॉटेल आणि पबमध्ये अवैध पद्धतीने हुक्का विक्री होणार नाही, याबाबतदेखील काळजी घ्यावी. ही सर्व जबाबदारी संबंधित परिमंडळाचे पोलिस उपायुक्त व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक यांची असणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

‘माय सेफ पुणे अ‍ॅपप्रमाणे अभ्यास करून कार्यवाही करा’

गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खुद्द पोलिस आयुक्त अनेकदा यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची जबाबदारी ही सर्व पोलिस उपायुक्तांची असणार आहे. माय सेफ पुणे अ‍ॅपप्रमाणे त्याचा अभ्यास करू, कार्यवाही केल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असेदेखील पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

Back to top button