पुणे : बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा बेमुदत बंद | पुढारी

पुणे : बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा बेमुदत बंद

पुणे : बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात शहरातील रिक्षाचालकांनी सोमवार (दि. 28) पासून बेमुदत बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सर्व रिक्षा बंद राहणार आहेत. पुणे आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मबघतोय रिक्षावालाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.  या वेळी शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, मनसे वाहतूक सेनेचे किशोर चिंतामणी, आरपीआय (आठवले गट) वाहतूक आघाडी युनियनचे अध्यक्ष अजीज शेख, एआयएमआयएम रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सय्यद, आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष आनंद अंकुश उपस्थित होते. डॉ. क्षीरसागर म्हणाले की, एक वर्षापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा बाईक टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या बेकायदा व्यावसायिकांमुळे महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच, कायदेशीररीत्या व्यवसाय करणार्‍या सव्वा लाख रिक्षाचालकांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. गेल्या वर्षभरात याबाबत आरटीओचे अधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्यासमोर हा विषय मांडूनही शहरात बेकायदा बाईक टॅक्सी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर रिक्षा बेमुदत बंद राहतील. या बंदमध्ये शहरातील सर्व रिक्षा संघटना सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी ठरल्यानुसार फक्त 50 रिक्षा शहरात धावतील, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

Back to top button