पुणे : गर्लफ्रेंडची हौस पडली महागात ! बाईक चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

पुणे : गर्लफ्रेंडची हौस पडली महागात ! बाईक चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीला फिरवण्यासठी तो दरवेळेस वेगवेगळी दुचाकी नेत होता. मात्र, त्याची ही चलाखी पोलिसांच्या नजरेतून जास्त दिवस सुटू शकली नाही. या दुचाकी चोरास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या मैत्रिणीला ठराविक ब्रँड 220 सीसीच्या दुचाकीवरच फिरायला आवडायचे. दुसरी दुचाकी नेल्यास ती बसायलाही नकार द्यायची. यामुळे त्याने ठराविक ब्रँडच्या 220 सीसीच्या दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता.

रोहित विष्णू क्षीरसागर (22, रा.जनता वसाहत, मूळ लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना रोहीत हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला जनता वसाहतीमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील दुचाकीची चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे आढळले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

यातील चार दुचाकी दत्तवाडी  पोलीस ठाण्याच्या तर एक विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरण्यात आली होती.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे. अंमलदार प्रमोद भोसले, कुंदन शिंदे आदींच्या पथकाने केली.

Back to top button