शिक्रापूर : ‘घोडगंगा’ निवडणुकीनिमित्त भाजपमध्ये संशयकल्लोळ | पुढारी

शिक्रापूर : ‘घोडगंगा’ निवडणुकीनिमित्त भाजपमध्ये संशयकल्लोळ

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : ’मताला नाही, तर उसाला तीन हजार रुपये भाव देणारच,’ अशी लोकप्रिय टॅगलाइन वापरत रावसाहेबदादा घोडगंगा सवकारी साखर कारखाना निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपसमर्थित किसान क्रांती पॅनेलचा 20 विरुद्ध 1 अशा फरकाने दारुण पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये संशयकल्लोळाचे वातावरण आहे.

शिरूर तालुका भाजपचे काही नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटल्याची चर्चा समोर आली आहे. यानंतर आमदार अशोक पवार यांनी देखील भाजपचे काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. यानंतर शिरूर भाजपचे तालुक्यातील नेते एकमेकांकडे संशयाने पाहत असून, ’घोडगंगा’च्या निवडणुकीमध्ये चांगली वातावरणनिर्मिती करूनसुद्धा पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे भाजपमधूनच फंदफितुरी तर झाली नाही ना? अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

आमदार अशोक पवारांनी भाजपमधील काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितल्याने तालुक्यातील भाजपचे नेते हैराण झाले असून, संशयाचे ढग अधिक गडद झाले आहेत. शिरूर-हवेलीतील भाजपचे नेते व जि. प.चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , संजय पाचंगे व अनेक नेत्यांना देखील भाजपच्या काही नेत्यांनी कारखाना निवडणूक प्रचारापासून दूर ठेवले होते. या नेत्यांना प्रचारापासून का दूर ठेवण्यात आले? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रदीप कंद यांना बाजूला ठेवत असताना हवेलीतील शिवसेनेशी निगडित एका नेत्याला विधानसभेत मदत करू, असे आश्वासन देत आर्थिक मदत घेतल्याचीही चर्चा शिरूर तालुक्यात जोरदार सुरू आहे. यामुळे भाजपसमर्थित किसान क्रांती पॅनेलच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत शंका व्यक्त होऊ लागली आहे. कारखान्यातील पराभव व अशोक पवारांचे वक्तव्य, यामुळे तालुक्यातील भाजप नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आ. पवार आमदार पाचपुतेंना भेटले, तर पवार भाजपमध्ये जाणार का?
आमचा किसान क्रांती पॅनेल हा सर्वपक्षीय होता. घोडगंगा कारखान्याची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटलो होतो. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शेतकरी संघटनेचे नेते, शिवसेनेचे शिंदे गटाचे, ठाकरे गटाचे नेते यांची देखील भेट घेतली आहे. या नेत्यांना भेटलो, याचा अर्थ आम्ही कुठल्या पक्षात प्रवेशासाठी भेटलो, असा होत नाही. आमदार पवार यांनी काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चुकीची माहिती दिली आहे.

आमदार अशोक पवार देखील भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना भेटले होते. मग, आम्हीसुद्धा ते भाजपमध्ये प्रवेश करणार का, असे म्हणायचे का? आमदार पवार यांच्या पॅनेलच्या प्रचारासाठी मोठी नेतेसुद्धा प्रचारास येण्यासाठी तयार नव्हते. या सर्व विषयांबाबत रविवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलणार आहे. बिनपैशाची निवडणूक लढवत असताना आम्हाला शेतकरी सभासदांनी भरभरून मतदान केलेले आहे, असे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व ’घोडगंगा’चे संचालक दादा पाटील फराटे यांनी सांगितले.

Back to top button