वेल्हे-हवेलीत भात कापणी वेगात; अवकाळीच्या तडाख्यातही चांगले उत्पन्न | पुढारी

वेल्हे-हवेलीत भात कापणी वेगात; अवकाळीच्या तडाख्यातही चांगले उत्पन्न

वेल्हे; पुढारी वृतसेवा : भातपिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेल्हे, तसेच पश्चिम हवेली तालुक्यात भातपिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी पोषक वातावरणामुळे भाताला चांगला उतारा मिळत आहे. दर वर्षीपेक्षा यंदा चांगले उत्पन्न मिळेल, असा अंदाज कृषी विभागाने केला आहे.

सिंहगड भागातील खामगाव मावळ, मोगरवाडी, वरदाडे, मालखेड, सोनापूर, आंबी, जांभली, तसेच वेल्हे तालुक्यातील निगडे, मोसे, ओसाडे, रुळे, रांजणे सह पानशेत राजगड – तोरणा भागात भातकापणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. खळे लावुन उशिरा मळणी करण्यापेक्षा कापणी केलेल्या पिकांची झोडणी केली जात आहे. गावोगावच्या शिवारात ातकापणी, मळणी, भाताला वारे देण्याच्या कामाची धांदल उडाली असल्याचे चित्र आहे.

मालखेड (ता. हवेली) येथील सचिन सुर्वे म्हणाले, की डिझेलचे दर वाढल्याने यांत्रिक पद्धतीने भात मळणीचे दर दुपटीने वाढले आहेत. एका पोत्याला दोनशे ते अडीचशे रुपये देणे परवडत नाही. मजुरीचा खर्चही तांदूळ विक्रीतून भागात नाही. त्यामुळे घरच्या घरी भाताची मळणी केली.

वेल्हे तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर म्हणाले, की यंदाच्या खरीप हंगामात भातपिकांसाठी उपयुक्त पाऊस झाला. त्यामुळे पिके चांगली वाढली. मध्यंतरी अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे थोडेफार नुकसान झाले, मात्र पोषक वातावरण व पुरेसा पाऊस पडल्याने भाताचे उत्पन्न चांगले मिळणार आहे.

इंद्रायणीचे प्रमाण 90 टक्के
वेल्हे तालुक्यात साडेपाच हजार हेक्टर, तर हवेली तालुक्यात जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्रात यंदा भाताची लागवड करण्यात आली होती. हळव्या, पारंपरिक जातीच्या भातपिकांची केवळ 10 टक्के लागवड आहे. 90 टक्के क्षेत्रावर इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड आहे. कृषी विभागाने यंदा सुधारित पद्धतीने भात लागवडीवर भर दिला. पोषक वातावरणामुळे यंदा एका गुंठ्याला 70 किलोंपेक्षा अधिक भाताचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मारुती साळे, हवेली तालुका कृषी अधिकारी.

Back to top button