वाल्ह्यातील पुलांची होणार दुरुस्ती? | पुढारी

वाल्ह्यातील पुलांची होणार दुरुस्ती?

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाल्हे (ता. पुरंदर) येथील गावात येणार्‍या तीनही पुलांवरून तीनवेळेस मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्याने यातील दोन्ही रस्त्यांवरील पुलांची मोठी दुरवस्था झाली आहे. गावातील अमोल भुजबळ, अतीश जगताप आदी युवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून पुलाच्या व रस्त्याच्या कामाची मागणी केली आहे.

पालकमंर्त्यांनी लवकरात लवकर या कामाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे युवकांनी सांगितले. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गापासून वाल्हे गावात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. हे दोन्ही मार्ग गावच्या पूर्वेकडून वाहणार्‍या मुख्य ओढ्यावरून जात आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने या दोन्ही पुलांचे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर गेल्याने या पुलाचे व रस्त्याचे नुकसान झाले आहे. एका पुलावरून श्री क्षेत्र वीर, हरणी, मांडकी, परिंचे, पिंगोरी, सारोळा आदींसह मोठ्या गावांसह वाल्हे परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाणारा मुख्य मार्ग आहे. खराब व जीवघेण्या रस्त्यावरूनच शालेय विद्यार्थी ये-जा करीत असून, यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.

दरम्यान, या युवकांनी ग्रामपंचायत वाल्हे यांनाही याबाबत पत्र देण्याची मागणी केली होती. तसे पत्रही ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्याचे अमोल भुजबळ यांनी सांगितले. दौंडचे आमदार राहुल कुल यांना वाल्हे येथील या कामाचा पाठपुरावा करण्याबाबत मागणी केल्याची माहितीही त्यांनी दिली. वाल्हेकरांना भेडसावणारा हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने गावकर्‍यांनी या तरुणांचे कौतुक केले.

Back to top button