पुणे जिल्ह्यातील 913 अंगणवाड्या अंधारात; निधी देऊनही काम अपूर्णच | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 913 अंगणवाड्या अंधारात; निधी देऊनही काम अपूर्णच

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेने वीज कनेक्शन देण्यासाठी एक हजार 181 अंगणवाड्यांना निधी दिला. मात्र, 913 अंगणवाडी केंद्रात अद्यापही वीजजोडणी होऊ शकलेली नाही. बालकांच्या संगोपनाची, त्यांना कुपोषण मुक्त करण्याची जबाबदारी असणार्‍या अंगणवाड्यांची ही स्थिती आहे. निधी दिल्यानंतर केवळ 268 अंगणवाड्यांना पूर्णपणे वीज मिळाली आहे.

तर, पॉईंट काढलेल्या अंगणवाड्यांची संख्या 142 आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये वीजजोडणी नव्हती अशा ठिकाणी वीजजोडणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी वर्ग केला होता. तरीही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. पुणे जिल्ह्यातील साडेतीन हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत.

उर्वरित अंगणवाड्यांमध्ये वीज असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अंगणवाडी केंद्रामध्ये सौरऊर्जा संचाद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी सौरऊर्जा संच उपलब्ध नाहीत. दरम्यान, अंगणवाडीमध्ये वीज जोडणीकरिता प्रत्येक ग्रामपंचायतींना तीन हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

तसेच, त्यांना वीजजोडणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जि. प. एकात्मिक बाल विकास योजना, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी योजना राबवली जाते. या योजनेतून अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.

‘बोलक्या भिंतीं’चे कामही अर्धवट
जिल्ह्यातील 405 अंगणवाडी केंद्रांना ‘बोलक्या भिंती’ करण्यास निधी देण्यात आला होता. मात्र, निम्म्या केंद्रांनीसुद्धा हे काम पूर्ण केले नाही. 248 केंद्रांचे काम बाकी असून, 157 केंद्रांनी बोलक्या भिंतींचे काम पूर्ण केले आहे.

Back to top button