पुणे : कार्यक्षमता प्रतवारीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर; या ही राज्यांनी पटकावला मान | पुढारी

पुणे : कार्यक्षमता प्रतवारीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर; या ही राज्यांनी पटकावला मान

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता व तेथील कार्यक्षमता, सोयी-सुविधा याचा विचार करून जाहीर करण्यात येणार्‍या ‘कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात’ यंदा महाराष्ट्राने मोठी आघाडी घेत केरळ,पंजाबसह 928 गुणांच्या आधारे संयुक्तरीत्या पहिल्या स्थानावर येण्याचा बहुमान मिळवला आहे. 2019-20 च्या तुलनेत महाराष्ट्राने 59 गुणांची अधिकची कमाई करीत 928 गुण मिळवले आहेत.

सरकारी शाळा आर्थिक, भौतिक व शैक्षणिकदृष्ट्या अद्यापही पूर्णत: सक्षम नाहीत. या सर्व सुविधा राज्यांनी शाळांमध्ये उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या सबलीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढविणे, शाळांच्या दर्जाचे मूल्यमापन करणे, शैक्षणिक सुधारणा करून योग्य शैक्षणिक नियोजन करणे आणि निधी उपलब्ध करून देणे, आदी व्यापक उद्देशाने काही मापदंड आखून प्रत्येक राज्याची क्रमवारी निश्चित करण्यासाठी ‘कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांका’ला सुरुवात केली आहे.

शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्य, केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एकसमान मोजण्यासाठी ‘कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक’ मदत करतो. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने आतापर्यंत राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी तीन अहवाल प्रसिद्ध केले आहेत. कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकांतर्गत दोन प्रमुख विभागांतर्गत 5 क्षेत्रे व 70 निदर्शक आहेत. यामधील माहितीचे संकलन प्रत्येक राज्यातील समन्वयकांमार्फत युडायस प्लस, नॅस, एमडीएम पोर्टलवर भरण्यात येते.

यामध्ये एकूण 1000 गुणांतर्गत 70 निदर्शक समाविष्ट आहेत. यामध्ये नीती, प्रशासन आणि व्यवस्थापन अंतर्गत गटबद्ध आहेत. अध्ययन निष्पत्ती, प्रवेश, पायाभूत सुविधा, समता आणि शासकीय प्रक्रिया, या पाच श्रेणींचा मागील वर्षामध्ये कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकांच्या समान दृष्टिकोनाचा अवलंब करून राज्य, केंद्रशासित प्रदेशांना श्रेणीबद्ध केले जाते.

महाराष्ट्राने 2019-20च्या तुलनेत आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यामध्ये भौतिक संसाधने व सुविधा व शासकीय प्रक्रिया या दोन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 2019-20 ची तुलना केली, तर अध्ययन निष्पती आणि गुणवत्ता, तसेच शाळा प्रवेश व निष्पत्तीमध्ये वाढ झाली नाही. भौतिक साधने आणि सुविधांमध्ये 17 गुणांची वाढ झाली आहे. समता या प्रकारात एका गुणाची वाढ झाली आहे. तर, शासकीय प्रक्रियेत तब्बल 41 गुणांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य पहिल्या स्थानावर आल्याचे दिसून येत आहे.

गुजरात, राजस्थान दुसर्‍या क्रमांकावर
कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात केरळ, पंजाब, महाराष्ट्र यांनी 928 गुण घेत संयुक्तरीत्या पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर गुजरात आणि राजस्थान राज्यांनी 903 गुण घेत संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर, 902 गुण घेत आंध— प्रदेश राज्य तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली, पद्दुचेरी, ओडिसा, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाना, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश आहे. तर, सर्वांत शेवटचा नंबर अरुणाचल प्रदेशाचा असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button