कडूस : दोंदे परिसरात दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला | पुढारी

कडूस : दोंदे परिसरात दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला

कडूस; पुढारी वृत्तसेवा: दोंदे (ता. खेड) येथील कोहिनकरवस्तीजवळ दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोंदे परिसरात दिवसेंदिवस बिबट्याच्या माणसांवर हल्ला करण्याच्या घटना सुरूच असून, सध्या परिसरात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. त्यातच हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या असून, नागरिक भयभीत झाले असून, संताप व्यक्त केला जात आहे.

सोमवारी (दि. 31 ऑक्टोबर) रात्री आठ वाजेच्या सुमारास सैंदाणे-ठाकरवाडी रस्त्यावर कोहिनकरवस्तीजवळ दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केला होता. नशीब बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून दोन्ही दुचाकीस्वार थोडक्यात बचावले असले, तरी दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. कडूस, दोंदे, वडगाव पाटोळे, चांडोली परिसरात बिबट्याचा नित्य वावर असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. परिसरात बिबट्याने अनेकदा माणसांवर चाल करण्याच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या वर्षी वडगाव पाटोळे येथील एक महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताजी असतानाच राजगुरुनगर-कडूस रस्त्यावरील व परिसरातील वाड्यावस्त्यांकडे जाणार्‍या दुचाकीस्वारांवर बिबट्याकडून हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
दोंदे येथील सैंदाणे ठाकरवाडी रस्त्यावर वेगवेगळ्या दुचाकीवरून जाणार्‍या शिवाजी मारुती बनकर व शिवराम सखाराम केदारी यांच्यावर बिबट्याने झेप घेतली होती. परस्परविरोधी दिशेला जाणार्‍या या दोघांमध्ये काही मीटरचे अंतर होते.

या हल्ल्यात बनकर यांच्या पायाला बिबट्याच्या नख्यांनी ओरबडल्याने जखम झाली, तर केदारी हेसुद्धा किरकोळ जखमी झाले असून, हल्ल्यात त्यांच्या दुचाकीचे सीट फाटले. गेल्या वर्षभरात वनविभागाने पिंजरा लावून वडगाव, दोंदे परिसरात चार बिबटे जेरबंद केले होते. तरीही पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत आहे.

गेल्या महिन्यातदेखील राजगुरुनगरहून कडूसकडे जाणार्‍या दुचाकीस्वार तरुणांना दोंदे-वडगाव रस्त्यावरील चिंचेच्या झाडाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले होते. बिबट्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. वनविभाग गांभीर्याने घेत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

Back to top button