शिवगंगा पुलावर केली साफसफाई; दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची बांधकाम विभागाने घेतली दखल | पुढारी

शिवगंगा पुलावर केली साफसफाई; दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची बांधकाम विभागाने घेतली दखल

नसरापूर; पुढारी वृतसेवा: सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवगंगा नदीवरील पुलाची देखरेख न केल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. याबाबत दैनिक ‘पुढारी’मधून वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने तातडीने पुलावरील साफसफाई केली आहे. या पाठपुराव्याबाबत प्रवासी व नागरिकांनी दै. ‘पुढारी’चे आभार मानले. नसरापूर-माळेगाव (ता. भोर) येथील शिवगंगा नदीवर वेल्ह्याकडे जाणार्‍या पुलावर दोन्ही बाजूला गाळाचा थर व त्यावर गवत- झाडी उगवली होती. पुलावरील पाणी वाहून नेणारी नलिका बंद होऊन पुलावर पाणी साचत होते. प्रवाशांसह विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबत दै. ‘पुढारी’ने मंगळवारी (दि. 11) वृत्त प्रसिद्ध केले.

बांधकाम विभागानेदेखील वेळोवेळी पुलाची देखभाल करणे गरजेचे असल्याचे सांगत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांनी तातडीने दखल घेतली. संबंधित अधिकार्‍यांना पुलावरील साफसफाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाने मजुरांमार्फत मंगळवारड्ढबुधवार या दोन दिवसात पुलावरील दुतर्फा साचलेला गाळ व वाढलेली झाडी व गवत काढले. तसेच नलिकेत अडकलेला राडारोडाही हटवला. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग सुकर झाला. दै. ‘पुढारी’चे आभार भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक ज्ञानेश्वर झोरे व ग्रामस्थांनी केले.

शिवगंगा पुलावरील दुतर्फा साठलेला राडारोडा व गवत काढले आहे. पुलावरील साफसफाई यापुढेही वेळोवेळी करण्यात येईल.
                                                   – पी. जी. गाडे, शाखा अभियंता, बांधकाम विभाग

Back to top button