बारामतीत सरासरीच्या दुप्पट पाऊस | पुढारी

बारामतीत सरासरीच्या दुप्पट पाऊस

बारामती; पुढारी वृत्तसेवा: वर्षभरात सरासरी 350 मिलिमीटर पावसाचे प्रमाण असणार्या बारामती तालुक्यावर यंदा वरुणराजाची कृपादृष्टी झाली. तालुक्यात दसर्यानंतरही पावसाचे घमासान सुरूच आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. पावसाला आता थांब रे बाब, असे म्हणण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे.  नवरात्रोत्सवात तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. दसर्यानंतर पाऊस उघडीप देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, दसर्‍यानंतरही पावसाचे घमासान सुरूच आहे. गेली दोन दिवस तालुक्यात जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शेतीच्या कामाचा कमालीचा खोळंबा झाला असून शेतातील पाणी रोज काढून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तणाची वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे खुरपणी करणेही अवघड झाले आहे. रोजच्या पावसामुळे शेतकरी वैतागले आहेत. दसर्‍यानंतर आता दिवाळीची धामधूम सुरू झाली असताना रोजच्या पावसाचा परिणाम व्यापारीपेठेवर होत आहे.

तालुक्यात बारामती, वडगाव निंबाळकर, लाटे, सोमेश्वर कारखाना, काटेवाडी, सोनगाव, मुर्टी, मोढवे, सावंतवाडी आदी भागात 1 जून ते आजअखेर 600 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. वडगाव निंबाळकर येथे सर्वाधिक 788 तर सोनगाव येथे 711 मिलिमीटर पाऊस 1 जूनपासून नोंदवला गेला. 1 जूनपासून चौधरवाडी, सुपा व नारोळी येथे 350 ते 375 मिलिमीटर पावसाची आजअखेर नोंद झाली. तालुक्यातील ही नीच्चांकी नोंद असली तरी येथेही सरासरी ओलांडली गेली आहे. बहुतांश ठिकाणी 400 ते 788 मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

24 तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलिमीटरमध्ये)
बारामती- 30, उंडवडी कडेपठार-10, सुपा-16, लोणी भापकर- 41, माळेगाव कॉलनी 18, वडगाव निंबाळकर-37, पणदरे-17, मोरगाव-21, लाटे-33, बर्‍हाणपूर-18, सोमेश्वर कारखाना 67, जळगाव कडेपठार – 27, आठ फाटा होळ- 39, माळेगाव कारखाना-15, मानाजीनगर-19, चांदगुडेवाडी-21, काटेवाडी-32, अंजनगाव-20, जळगाव सुपे- 39, केव्हीके-19, सोनगाव -43, कटफळ-29, सायंबाचीवाडी-14, चौधरवाडी-19, नारोळी-18, कार्‍हाटी-18, गाडीखेल-23, जराडवाडी-48, पळशी-41, सावंतवाडी-60, मुर्टी-60.

Back to top button