पुणे : ‘लाल फीत’अन् वर्तुळाकार मार्गाचे अपहरण! | पुढारी

पुणे : ‘लाल फीत’अन् वर्तुळाकार मार्गाचे अपहरण!

हिरा सरवदे
पुणे : शहरामध्ये केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी आखण्यात आलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे म्हणजेच एचसीएमटीआरचे अपहरण करीत खासगी वाहतुकीसाठी तो सर्रास खुला करण्याचा घातक प्रयत्न अखेर निओ मेट्रोच्या प्रस्तावाने सुदैवाने हाणून पडला आहे. मात्र, 1987 मध्ये कागदावर आलेला हा मार्ग त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षांनीही कागदावरच राहिला असल्याने पुणेकरांना वाहतुकीच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते आहे.

पुण्याच्या 1987 च्या विकास आराखड्यात उच्च क्षमता द्रुतगती मार्ग-हाय कपॅसिटी मास ट्रांझिट रूट आखण्यात आला होता. पुण्यातील या अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यावरील सार्वजनिक वाहतुकीद्वारे कोणालाही शहराच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जाण्यासाठी हा मार्ग होता. तसेच, तो पिंपरीच्या एचसीएमटीआरलाही जोडल्याने पुणे-पिंपरी यादरम्यान तुम्हाला सहजी प्रवास करता येणार होता.

हा एचसीएमटीआर अनेक वर्षे कागदावर राहिल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली खरी; पण तो खासगी वाहनांसाठी करण्याचा धक्कादायक आणि धोकादायक प्रस्ताव त्याला जोडण्यात आला. खासगी वाहतुकीच्या मागणीमागे बांधकाम व्यावसायिकांची लॉबी असल्याचे बोलले गेले. त्यावर टीका झाल्याने कशीबशी त्यातील एक लेन पीएमपीसाठी म्हणजे बीआरटीसाठी राखून ठेवणार असल्याची सारवासारव करण्यात आली.

वास्तविक, सर्वच मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी राखून ठेवण्याची गरज असताना आणि खासगी वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आल्यास वाहतुकीची समस्या आणखी भडकेल, हे माहिती असतानाही खासगी वाहतुकीचा आग्रह धरण्यात आला. खासगी वाहतुकीसाठी हा मार्ग करण्याची तयारी सुरू झाल्याने मग या मार्गाची पावले वेगाने पडू लागली. त्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातही नगरसेवकांनी चबढब केली. त्यांच्या विविध प्रस्तावांनुसार वारंवार या मार्गाच्या आखणीत बदल करून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून 5 हजार 192 कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या.

सुरुवातीस निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने त्या पुन्हा मागविण्यात आल्या. यामध्ये सर्वांत कमी दराची 7 हजार 525 कोटी रुपयांची निविदा ही गावर आणि लाँगजियान या चीनच्या कंपन्यांनी संयुक्तरीत्या भरली. दुसरी निविदा वेलस्पन, अदानी ग्रुप आणि सीसीटीईबीसीएल या कंपन्यांनी 7 हजार 966 कोटी रुपयांची संयुक्तरीत्या भरली. आलेल्या निविदा सुमारे 45 ते 50 टक्के अधिक दराने आल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली.

दरम्यानच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांसाठी एकाच प्रकारचा मार्ग किंवा निओ मेट्रोचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही निओ मेट्रोसाठी केंद्राची मदत मिळेल, असेही म्हटले होते. त्यानुसार महापालिकेने महामेट्रोला निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार करण्यास सांगितले होते.
महामेट्रो ने 44 किमीचा निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार करून मागील आठवड्यातच महापालिकेला सादर केला आहे.

या प्रकल्पासाठी 4 हजार 940 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग अस्तित्वात असलेल्या मेट्रो मार्ग आणि प्रस्तावित मेट्रो मार्गाला आठ ठिकाणी जोडला जाणार आहे. बोपोडीपासून सुरू होणारा मार्ग विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, कोथरूड, एरंडवणे, म्हात्रे पूल, सिंहगड रस्ता, सारसबाग, स्वारगेट, सातारा रोड, बिबवेवाडी, कोंढवा-एनआयबीएम रोड, वानवडी, एम्प्रेस गार्डन, मुंढवा, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, खडकी बाजार आदी भागांतून जाईल. या प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे एचसीएमटीआर निओ मेट्रो पद्धतीने अमलात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Back to top button