पुणे : त्या पोलिसांवर खंडणीचा गुन्हा; चौकशीअंती गुन्हा दाखल, दैनिक ‘पुढारी’ने मांडले होते वास्तव | पुढारी

पुणे : त्या पोलिसांवर खंडणीचा गुन्हा; चौकशीअंती गुन्हा दाखल, दैनिक ‘पुढारी’ने मांडले होते वास्तव

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गाडी बाजूला घेण्याच्या कारणातून झालेल्या वादात पेट्रोल पंपचालकाला मारहाण करून, त्याच्याच विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसावरच आता पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. चौकशीत हा प्रकार समोर आला असून, संबंधित कर्मचार्‍याची मुख्यालयात बदली केल्यानंतर आता त्याच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे.

प्रदीप रावसाहेब मोटे (वय 35, रा. वाघोली) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत लोहगाव येथील पेट्रोप पंपचालक काळूराम दत्तात्रय खांदवे (वय 35, रा. कोपरआळी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यात (दि.19) लोहगाव परिसरातील जगद्गुरू पेट्रोलपंपासमोर घडला होता.

पेट्रोल पंपासमोर लावलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीत पाच जणांनी मिळून एका पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिस कर्मचारी मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कालिदास खांदवे, माऊली खांदवे व इतर तिघे अशा पाच जणांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. मात्र, त्यानंतर या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला होता.

त्यामध्ये पोलिस कर्मचारी हा अगोदर दांडक्याने मारहाण करत असल्याचे दिसून येत होते. तसा आरोपदेखील खांदवे कुटूंबीयांनी केला होता. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे धाव घेत आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन तक्रार अर्ज दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तांकडे याची चौकशी देण्यात आली होती. दरम्यान, दैनिक पुढारीने ‘ऑफ द रेकॉर्ड’ या सदरात ‘उलटा चोर, पोलिसानेच आधी मारले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून संबंधित घटनेचे वास्तव समोर मांडले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवे यांचा लोहगाव भागात पेट्रोल पंप आहे. मोटे हे खांदवे यांच्या पंपावर आले, मी पोलिस आहे. कोणी तुम्हाला त्रास देऊ नये आणि आमचीही चलती राहावी यासाठी दरमहा हप्ता द्यावा लागेल, असे सांगत मोटेने खांदवेना दम भरला. हप्ता देण्याची पद्धत माहीत नाही का, असे म्हणत पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. यात मोटे यांनी खांदवे आणि त्यांचा भाऊ तुकाराम यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी खांदवे यांनी फिर्याद दिली होती. यानुसार मोटे यांच्या विरोधात खंडणी तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. लहाने करत आहेत.

सीसीटीव्हीमुळे वास्तव समोर
कर्मचारी मोटे आणि पंपचालक खांदवे यांच्यात झालेल्या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. खांदवे बंधूंनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा मोटे यांनी केला होता. यानुसार खांदवे बंधूंवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. मात्र, यानंतर समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये प्रथम मोटे यांनीच मारहाण केल्याचे दिसून आले. यानुसार गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. चौकशीअंती मोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उचलबांगडीनंतर निलंबन
हा प्रकार घडल्यानंतर मोटे यांची झालेली बदली रद्द करून मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना खात्यातूनदेखील निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पेट्रोल पंपाच्या रस्त्यावर मोटे यांनी त्यांची कार लावली. कामगार सचिन मिरगे व काळुराम खांदवे यांनी कार बाजूला घेण्यास सांगितले असतादेखील ती बाजूला घेतली नाही. तेथे खांदवे यांच्यासोबत वादावादी केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. सुरुवातीला मोटे यांनी गाडी काढण्यास सामंजस्याची भूमिका घेतली असती, तर पुढील घटना टळली असती, असे चौकशीत समोर आले.

Back to top button