पिंपरी : बूस्टर डोस घेण्याविषयी अनास्था ; दुसरा डोस घेतलेल्या एकूण नागरिकांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 4.64 टक्के इतके | पुढारी

पिंपरी : बूस्टर डोस घेण्याविषयी अनास्था ; दुसरा डोस घेतलेल्या एकूण नागरिकांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 4.64 टक्के इतके

दीपेश सुराणा :

पिंपरी : कोरोनाचा बूस्टर डोस जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, या उद्देशाने केंद्र सरकारने 18 ते 59 या वयोगटांतील नागरिकांना 75 दिवसांसाठी कोरोनाचा बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून दिला होता. मात्र, या कालावधीत शहरामध्ये संबंधित वयोगटांतील केवळ 68 हजार 369 नागरिकांनीच बूस्टर डोस घेतल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत दुसरा डोस घेतलेल्या एकूण नागरिकांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 4.64 टक्के इतके नगण्य आहे.

75 दिवसांच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 या वयोगटांतील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार, 15 जुलैपासून हे मोफत बूस्टर डोस केंद्रांवर देण्यास सुरुवात झाली. आजअखेर त्याबाबतची माहिती घेतली असता, संबंधित वयोगटांतील एकूण 14 लाख 70 हजार 516 नागरिकांनी आत्तापर्यंत कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. त्यापैकी गेल्या 75 दिवसांमध्ये 68 हजार 369 जणांनीच बूस्टर डोस घेतला आहे. टक्केवारीत हे प्रमाण 4.64 टक्के इतके अत्यल्प आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याबाबत नागरिकांची उदासीनताच पाहण्यास मिळाली आहे.

एकूण प्रमाण 12.51 टक्के
शहरामध्ये आजअखेर 18 वयोगटापासून पुढील सर्व वयोगटांतील एकूण 16 लाख 26 हजार 634 नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतलेला आहे. त्यापैकी 2 लाख 3 हजार 566 जणांनीच बूस्टर डोस घेतला आहे. म्हणजे हे प्रमाण देखील दुसर्‍या डोसच्या तुलनेत केवळ 12.51 टक्के  इतके अत्यल्पच आहे.

बूस्टर डोस न घेण्याची कारणे
दोन डोस घेतल्यानंतर आता बूस्टर डोसची गरज काय, अशी उदासीन मानसिकता
बूस्टर डोस घेतल्यानंतर त्यामुळे त्रास झाल्यास काय करायचे, अशा विचारातून टाळाटाळ
लस तुटवडा निर्माण झाल्यानंतर लस न मिळाल्यास माराव्या लागणार्‍या हेलपाट्यांमुळे दुर्लक्ष

मृत्यू दर केवळ 1.24 टक्के
शहरामध्ये आजअखेर एकूण 3 लाख 71 हजार 605 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी केवळ 4 हजार 629 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हणजे मृत्यू दर हा केवळ 1.24 टक्के इतका नगण्य राहिला आहे.

बरे होण्याचे प्रमाण  98.86 टक्के
कोरोनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे तुलनेत खूप चांगले आहे. आत्तापर्यंत जवळपास 98.86 टक्के बाधित रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आजअखेर बाधित झालेल्या 3 लाख 71 हजार 605 रुग्णांपैकी 3 लाख 67 हजार 392 रुग्ण बरे झाले आहेत.

Back to top button