सोमेश्वरनगर : दहा गावे माळेगावला जोडण्यास मंजुरी | पुढारी

सोमेश्वरनगर : दहा गावे माळेगावला जोडण्यास मंजुरी

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडील दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी गुरुवारी वार्षिक सभेस मंजुरी दिली. कारखान्याकडे स्थापनेपासून जोडलेली दहा गावे माळेगाव कारखान्याने मागितली होती. अनेक सभासदांनी या निर्णायाला विरोध तर काहींनी पाठिंबा दर्शविला. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी या गावातील शेतकर्‍यांना ही गावे जोडण्याबाबत सविस्तर माहिती दिली. नवीन सभासद करून घेण्यास सोमेश्वरला बंधन असून चालू हंगामात 40 हजार 788 टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याचे जगताप यांनी सांगितले.

जगताप म्हणाले की, अतिरिक्त ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. कमी दरात ऊस दुसरीकडे द्यावा लागत आहे. दहा गावांचे कार्यक्षेत्र सोमेश्वर कारखान्यासाठी लांब तर माळेगावला जवळ असल्याने याचा फायदा येथील शेतकर्‍यांना होईल. अंजनगाव, जळगाव कप, जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, कर्‍हाटी, खराडेवाडी आदी गावे यापुढे माळेगावला जोडली जाणार आहेत. जळगाव कप येथील तानाजी खोमणे, सुरेश वळकुंद्रे, भिलारवाडी येथील गोरख चौलंग, जळगाव सुपे येथील अनिल जगताप, नारोळी येथील संजय पोमण, अंजनगाव येथील दिलीप परकाळे, कार्‍हाटी येथील बी. के. जाधव यांनी माळेगावला गावे जोडण्यास परवानगी दिली.

दिलीप पवार यांनी ज्याचा त्याचा निर्णय घेण्याचे मत व्यक्त केले. माळेगावने नविन सभासद करून घेण्यास परवानगी द्यावी, ऊसाचे गाळप अग्रक्रमाने करावे, जिरायती भागात पाण्याची कमतरता असल्याने ऊस गाळपास उशीर होतो त्यामुळे टनेज मध्ये घट होऊन नुकसान होते, माळेगावला मंगल कार्यालय, शैक्षणिक संकुल असल्याने गावे जोडण्यास मंजुरी द्यावी आदी विषयावर सभासदांनी सभेत चर्चा केली.माळेगावला जोडलो तर शेअरचे काय होणार असा सवालही सभासदांनी विचारला.

शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी संचालकांना आदेश आला की लगेच सभेत विषय घेतला. माळेगावचा लय पुळका आलाय का, या अगोदर ही गावे का जोडली नाहीत, ्सा सवाल केला. उतारा कमी असतानाही जिरायती भागातील ऊस लवकर गाळपास आणला जातो. अस्तरीकणामुळे बारामतीतील पाणी गायब झाले आहे याचा परिणाम कारखान्यावर होणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. सोमेश्वर कारखाना टिकला पाहिजे अन्यथा पुढील पीढी माफ करणार नाही.एक कारखाना विरोधात पाहिजे तेव्हाच दराची स्पर्धा होते, असे ते म्हणाले.

Back to top button