पुणे : व्हायरल इन्फेक्शन, थेट फुप्फुसांशी कनेक्शन! | पुढारी

पुणे : व्हायरल इन्फेक्शन, थेट फुप्फुसांशी कनेक्शन!

प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : शहरात सगळीकडे ‘व्हायरल फिव्हर’मुळे लहान दवाखान्यांपासून मोठ्या रुग्णालयांपर्यंत रुग्णांची रांग लागली आहे. हा आजार बर्‍याचदा फुप्फुसांवर परिणाम करतो. अँटिबायोटिक औषधे ही विषाणुजन्य आजारांवरील उपचार नाहीत. अँटिव्हायरल उपचार घेतल्यास आजारातून लवकर बरे होता येते, असा सल्ला वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये सध्या सर्दी, खोकला, कफ होणे, ताप, अंगदुखी, थकवा, श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, अशा तक्रारी दिसून येत आहेत. सर्वांत जास्त प्रमाणात एच 1 एन 1, त्यानंतर डेंग्यू आणि मग कोरोना विषाणूंचे निदान होत आहे.

एच 1 एन 1 विषाणूचे वेळीच निदान न झाल्यास तो थेट फुप्फुसांवर हल्ला करतो. आजार अंगावर काढल्यास अथवा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास सात ते दहा दिवसांनी निमोनियाचे निदान होते आणि त्यातून रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची वेळ येते. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण, स्थूल व्यक्ती यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने विषाणू थेट हल्ला करतात आणि संसर्ग बळावतो. त्यामुळे स्वत:च्या मनाने घरी उपलब्ध असलेली औषधे घेणे, पूर्वीची चिठ्ठी दाखवून किंवा लक्षणे सांगून औषधविक्रेत्यांकडून परस्पर औषधे घेणे, डॉक्टरांची चुकीची निवड हे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

 

विषाणुजन्य आजारांच्या निदानासाठी तोंडातील अथवा नाकातील स्रावाचे नमुने (स्वॅब) घेतले जातात. विषाणूमुळे शरीराला किती हानी पोहचली आहे, हे जाणून घेण्यासाठी रक्ततपासणी केली जाते. बरेचदा लक्षणे उशिरा दिसल्याने उपचारांना उशीर होतो. विषाणूंचे बदलते स्ट्रेनही यास कारणीभूत ठरतात. सध्या एच 1 एन 1 चे स्ट्रेन वाढल्याचे दिसून येत आहे.
                                   – डॉ. अंजली कामत, एमडी मेडिसीन, ससून रुग्णालय

सध्या कमी प्रमाणात कोरोना, मध्यम प्रमाणात डेंग्यू आणि जास्त प्रमाणात एच 1 एन 1चा प्रसार होताना दिसत आहे. रेस्पिरेटरी व्हायरसमुळे फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या विषाणूमुळे पहिले दोन-तीन दिवस सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसतात आणि सात दिवसांनी दम लागणे, श्वसनाच्या समस्या समोर येतात. वेळीच निदान न झाल्यास किडनी, हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वेळीच योग्य डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार करून घ्यायला हवेत.
                                          – डॉ. अमित द्रविड,  विषाणुजन्य आजारांचे तज्ज्ञ

Back to top button