पत्नीचा खून करून फरारी झालेला गजाआड; शिरूर पोलिसांची कामगिरी | पुढारी

पत्नीचा खून करून फरारी झालेला गजाआड; शिरूर पोलिसांची कामगिरी

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा: ललिता महादेव काळे या महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून कुर्‍हाडीने वार करीत खून करून पती महादेव सुरेश काळे हा फरारी झाला होता. त्याला पकडण्याचे आव्हान शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले होते. त्याला 24 तासांत शिरूर पोलिसांनी अटक केली. संशयित महादेव काळे याच्याकडे मोबाईल नसल्याने त्याला शोधण्यास अडचण येत होती.

परंतु टाकळी हाजी दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक फौजदार नाजिम पठाण, पोलिस शिपाई विशाल पालवे यांनी तपासाची सूत्रे हातात घेत तातडीने करमाळा येथे रवाना झाले. खबर्‍यांच्या मदतीने फरारी संशयिताला करमाळा (जि. सोलापूर) येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. कुठलाही मागमूस नसतानाही फरारी आरोपी गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, दीपक पवार, विशाल पालवे, अनिल आगलावे यांच्या पथकाने केली.

Back to top button