पुण्यात ‘पीएफआय’कडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा | पुढारी

पुण्यात ‘पीएफआय’कडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या समर्थकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा दावा करणारे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी ते तपासण्यासाठी घेतले आहेत. त्या व्हिडीओंची सत्यता पडताळून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय व राज्यातील तपास यंत्रणेने गुरुवारी ताब्यात घेतले.

त्याच्या निषेधार्थ पुण्यात शुक्रवारी ‘पीएफआय’च्या समर्थकांनी आंदोलन केले होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करीत आंदोलन केल्याप्रकरणी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनावेळी केलेल्या घोषणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये आंदोलक विविध घोषणा देताना दिसत आहेत. त्यात वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात होत्या.

आंदोलकांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जिंदाबाद’, ‘अल्ला हो अकबर’ अशा एकाचवेळी घोषणा दिल्या जात होत्या. त्यातूनच ‘पॉप्युलर फ्रंट जिंदाबाद’ अशीही घोषणा होती. परवानगी नसतानाही बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी 41 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

शिवरायांच्या भूमीत असले नारे सहन केले जाणार नाहीत पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले, त्यांच्यावर पोलिस यंत्रणा योग्य ती कारवाई करेलच; पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
                                      – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Back to top button