शिक्रापूर : राजकीय नेत्यांशी जवळीक सांगणारा अटकेत | पुढारी

शिक्रापूर : राजकीय नेत्यांशी जवळीक सांगणारा अटकेत

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील नेत्यांशी जवळीक सांगत सोशल मीडियात त्याचे फोटो सातत्याने व्हायरल करीत असलेला व गेले पाच महिने पोलिसांना गुंगारा देणारा खंडणी गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश जगताप (रा. पिंपळे-जगताप, ता. शिरूर) याला शिक्रापूर पोलिसांनी अखेर अटक केली. सणसवाडीतील भारत गॅस कंपनीतील एका परप्रांतीय ठेकेदारास मारहाण करून त्याने दोन लाखांची खंडणी उकळली होती व दर महिन्याला 50 हजारांची खंडणी देण्यासाठी त्याने मागणी केली होती.

याबाबत शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले, की पाच महिन्यांपूर्वी भारत गॅस कंपनीत फुलसिंग रेवती यादव (रा. चाकण, मूळ रा. राजस्थान) हा लेबर कॉन्ट्रॅक्टरशी नियमित बैठक करून कंपनीतून बाहेर पडला. या वेळी महेश जगताप याने उचलून आपल्या गाडीत बसवून जवळच्या तळ्याजवळ नेले होते. तेथे त्याला महेश आणि त्याच्या एका साथीदाराने जबर मारहाण केली होती. मारहाण करतानाच आरोपीने फिर्यादीकडे तब्बल साडेतीन लाखांची खंडणी तत्काळ देण्याची मागणी करीत जिवे मारण्याची धमकीही दिली होती.

या वेळी फिर्यादी यादव याने त्याचे मित्र व नातेवाइकांकडून दोन लाखांची तजवीज गुगल-पेवर केल्याने व उर्वरित दीड लाख रुपये नंतर देण्याच्या हवाल्याने त्याला सोडून देण्यात आले होते. याशिवाय, फिर्यादी यादव याला कंपनीतील कंत्राट सुरू ठेवायचे असल्यास दर महिन्याला 50 हजार देण्याचा तगादाही जगताप याचा सतत सुरू होता. याबाबतची रीतसर तक्रार 4 मे 2022 रोजी दाखल झाल्यापासून आरोपी महेश जगताप हा पोलिसांना सतत गुंगारा देत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो उघडपणे फिरत होता.

परिसरात तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवारांसह भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची नावे व त्यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत त्यामुळेच आपल्याला अटक होत नसल्याचे तो बिनधास्त सांगत होता. ही बाब पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना समजताच त्यांनी जगतापसाठी स्वतंत्र पथक नेमले व त्याला बुधवारी पिंपळे-जगताप येथील एका पेट्रोलपंपावरून ताब्यात घेत अटक केली.

Back to top button