…आता शंखी गोगलगायींचा उपद्रव ! दरकवाडी परिसरातील चित्र | पुढारी

...आता शंखी गोगलगायींचा उपद्रव ! दरकवाडी परिसरातील चित्र

वाडा : पुढारी वृत्तसेवा : दरकवाडी (ता. खेड) येथील शेतकर्‍यांवर शंखी गोगलगायींच्या उपद्रवामुळे पावसानंतर दुसरे संकट आले आहे. शेतातील उभे पीक फस्त होत असून, लाखोंच्या घरात असणार्‍या या गोगलगायींपासून आपले पीक वाचवायचे कसे? अशा सवाल शेतकर्‍यांपुढे आहे. जवळील डोंगरावर सुशोभीकरणासाठी आणण्यात आलेल्या परदेशी झाडांबरोबर या शंखी गोगलगायी आल्या असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊन त्या पिकांवर आल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.  दरकवाडी, हाबटोक परिसरात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतीवर शंखी गोगलगायींचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. सोयाबीन, घेवडा व अन्य कोवळी पिके या गोगलगाय फस्त करीत असून, त्या लाखोंच्या पटीत असून, जेवढ्या नष्ट करण्यात येतात, त्याच्या दुप्पट गोगलगायी पुन्हा शेतांमध्ये येत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून याचा प्रादुर्भाव या भागात दिसत आहे.

याबाबत बोलताना स्थानिक शेतकरी नितीन लगड यांनी या गोगलगायींचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होते. त्या आकाराने 5 सेंटिमीटर इतक्या असून, वजनाने अंदाजे 150 ते 200 ग्रॅमपेक्षा जास्त असतात. त्यांना पकडताना भीती वाटते. या गोगलगायी एका वेळी 1 हजार ते 2 हजार अंडी घालत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे किंबहुना पुढील काळात त्या अवतीभोवतीचा परिसर व्यापून मोठा उपद्रव करून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होईल.  येथील उपद्रवग्रस्त शेतकरी नितीन लगड, रंगनाथ पाचंगे, सुनंदा सुपे, सावळेराम वाजे, नामदेव काळे यांसह अन्य वीस शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये या गोगलगायींचा उपद्रव झाला असून, मोठ्या प्रमाणावर पिंकांचे नुकसान झाले आहे.

कृषी अधिकार्‍यांची पाहणी
तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, मंडलाधिकारी रामचंद्र बारवे, कृषी सहायक दिगंबर डोलारे यांसह संबंधित शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेताचे बांध स्वच्छ ठेवा, सकाळी व सायंकाळी सूर्योदयापूर्वी गोगलगायी गोळा करून साबणाचे पाणी व मिठाच्या पाण्यात किंवा मोरचुदाच्या द्रावणात बुडवून मारा. शेतात जागोजागी गवताचे ढीग करून ठेवा. गवताच्या वा गुळाच्या पाण्याने भिजवलेली पोती शेतात पसरवा; जेणेकरून या गोगलगायी लपायला या पोत्यांखाली वा गवताच्या ढिगाखाली आल्यावर त्याखाली सापडतील व त्यानंतर त्या नष्ट काराव्यात. मेटाल्डीहाईड एकरी दोन किलो शेतात पसरवून टाकावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Back to top button