पुणे : ज्ञानाच्या जोरावर महिलांकडे ‘बँकिंग’चे नेतृत्व येईल: फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर | पुढारी

पुणे : ज्ञानाच्या जोरावर महिलांकडे ‘बँकिंग’चे नेतृत्व येईल: फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला सध्या जनमानसात विश्वास निर्माण करण्याची गरज असून, या क्षेत्रातील महिला संचालकांनी हे आव्हान स्वीकारून कार्यरत रहाणे आवश्यक आहे, असे मत दी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.  फेडरेशनने मुंबईत (दि. 17) राज्यस्तरीय महिला संचालकांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील सुमारे शंभरहून अधिक महिला संचालिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

या प्रसंगी फेडरेशनच्या संचालिका शशी अहिरे, शोभा सावंत तसेच उद्यम बँकेच्या संचालिका लीना अनास्कर व फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी व सचिव सायली भोईर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘सहकार कायद्यामध्ये दोन महिला संचालकांची असलेली राखीव तरतूद व त्यामुळे महिलांना नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळात मिळालेले स्थान, इतक्या मर्यादित स्वरूपात हा सहभाग न ठेवता, महिलांनी खुल्या प्रवर्गातूनही निवडून येणे आवश्यक आहे.

त्यासाठी संचालक मंडळातील कामकाजात प्रभावी योगदान देण्यासाठी बँकिंगविषयक कायदा, नियम, व्यवहार, उपविधींचे ज्ञान व त्यांची आवश्यकता, याविषयी सखोल माहिती मिळविल्यास महिलांचा सहभाग हा ज्ञानाधिष्ठित होईल,’ असे अनास्कर म्हणालेे.
सहकारी मूलतत्त्वे, सहकारी बँकिंगचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व, परिणामकारक निर्णय प्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी इत्यादी माहितीचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे संदर्भ देत त्यांनी सादरीकरणही केले. रिझर्व्ह बँकेच्या उपमहाव्यवस्थापक भाग्यलता कौशिक यांनीही मनोगत व्यक्त केले.

Back to top button