मंचर : डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले; 22 हजार 66 क्युसेकने विसर्ग | पुढारी

मंचर : डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले; 22 हजार 66 क्युसेकने विसर्ग

मंचर / घोडेगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात मोठ्या स्वरूपाचा जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) पाचही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग घोड नदीपात्रात करण्यात येत आहे. सुमारे 22 हजार 66 क्युसेकने पाण्याचा विसर्ग घोड नदीपात्रात शुक्रवारी (दि. 16) सुरू करण्यात आला. त्यामुळे घोड नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पश्चिम आदिवासी भागात यापेक्षाही जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे मोठ्या स्वरूपात पाणी डिंभे धरणामध्ये (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) येत आहे. याआधीच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे अतिरिक्त येणारे पाणी धरणात येऊ लागल्यावर धरणाचा साठा वाढू लागला आहे. त्यामुळे डिंभे धरणाच्या पाचही दरवाजांमधून 22 हजार 66 क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे, अशी माहिती शाखा अभियंता तानाजी चिखले यांनी दिली. त्यामुळे घोड नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस असाच मोठ्या स्वरूपात चालू राहिला तर नदीला मोठा पूर येईल. डिंभे धरणातून सोडलेले पाणी, त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावांतील ओढ्या-नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीला येत आहे. त्यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीकाठच्या अनेक गावांमधील शेतीपिकांना या पाण्याचा फटका बसत आहे. नदीतील पाण्यात वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कडूसकर आणि वरिष्ठ अधिकारी दत्ता कोकणे यांनी केले आहे.

Back to top button