खडकवासला, पानशेत, वरसगाव पाणलोटला फार्म हाऊसचे पेव; धरणाला अतिक्रमणांचा विळखा! | पुढारी

खडकवासला, पानशेत, वरसगाव पाणलोटला फार्म हाऊसचे पेव; धरणाला अतिक्रमणांचा विळखा!

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या पानशेत, वरसगाव, तसेच खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रानजीक जागा घेऊन तेथे बेकायदेशीररीत्या फार्म हाऊस बांधण्याचे पेवच फुटले आहे. परिणामी धरणांच्या पाण्यात मैला पाण्यासह विषारी रासायनिक पदार्थ सोडले जात असल्याने पुण्याचे पिण्याचे पाणी दूषित होत असून, ते रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

राज्य सरकारने धरणांतील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी धरणाच्या दोन्ही बाजूंना दोनशे मीटर परिसरात बांधकामांना मनाई करण्याचा आदेश नुकताच काढला आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक पुढारीने या परिसराची आज पाहणी केली. यात पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणामुळे धरणांना मिळणार्‍या नद्यांच्या पात्रासह ओढे, नाले लुप्त झाल्याचे आढळून आले. या तीनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अलीकडे मोठ्या प्रमाणात बांधकामे, अतिक्रमणे झाली आहेत. तसेच हॉटेल, अलिशान बंगले, विविध कंपन्यांची बांधकामे वर्षानुवर्षे परिसरात उभी आहेत.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यासाठी खडकवासला जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केली होती, असे सांगण्यात आले. तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्राबाहेरील पाटबंधारे विभागाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्जही करण्यात आला होता. मात्र, भूमी अभिलेख विभागाने दोन वर्षांपासून कोणत्याही ठिकाणी मोजणी केली नाही. ही मोजणी झाल्यास धरणक्षेत्रातील जमिनींवर किती अतिक्रमणे आहेत, याची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी बि—टिश राजवटीत 1879 मध्ये खडकवासला धरण बांधण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1957 मध्ये पानशेत व 1977 मध्ये वरसगाव धरण बांधण्यात आले. धरण क्षेत्रातील पाटबंधारे खात्याच्या जमिनींची मोजणी बि—टिश राजवटीनंतर प्रथमच करण्यात येणार आहे.

पाणलोट क्षेत्रात पाटबंधारे विभागाची जवळपास पाचशे एकरांहून अधिक जमीन आहे, तसेच तीरालगत जलसंपदा विभागाच्या बहुतांश जमिनीवर, तसेच ओढे-नाल्यांवर खासगी कंपन्यांची फार्म हाऊस, हॉटेल, मॉल्सची अतिक्रमणे आहेत. याबाबत विचारणा केली असता, बांधकाम केलेल्या जमिनीचा सातबारा असल्याचे सांगितले जाते. मात्र, जलसंपदा विभागाच्या पाहणीत पूररेषा, पाणलोट क्षेत्रात अतिक्रमणे, बांधकाम झाल्याचे समोर  आले आहे.

खडकवासला, पानशेत, तसेच वरसगाव धरणांच्या संपादित तसेच जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जमिनीवर बांधकामे उभी आहेत. बहुतेक बांधकामे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दगड मातीचे भराव टाकून कंपन्या, फार्म हाऊस, बंगले, हॉटेले आदींची उभारणी झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाणलोट क्षेत्रच अनेक ठिकाणी आकसले आहे. खडकवासला धरण क्षेत्रात गोर्‍हे खुर्द, खानापूर, कुडजे, तसेच पुणे -पानशेत रस्त्यालगतच्या धरण क्षेत्रात अशी बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे धरण तुडुंब भरल्यानंतर सर्वप्रथम या बांधकामांना पाणी लागते, असे आजूबाजूच्या नागरिकांकडून सांगण्यात आले.

संबंधित जमिनीचा सातबारा आपल्या मालकीचा असल्याचे दाखवून अतिक्रमण करणारे आपली बाजू मांडत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने तीनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याबाहेरील तसेच
संपादित जमिनीच्या मोजणीचा प्रस्ताव रीतसर पुणे भूमी अभिलेख यामुळे तीनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जलसंपदा विभागाची नेमकी कोठे व किती जमीन आहे याची माहितीच उपलब्ध नाही.

आधीच्या बांधकामांचे काय?
राज्य सरकारने धरण क्षेत्रापासून दोनशे मीटर अंतराच्या परिसरात बांधकामांना मनाई केली आहे. त्यामुळे अशा बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही, असे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले असले, तरी आधीच्या बांधकामांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली कबुली
विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी खडकवासला धरणातील प्रदूषणाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘खडकवासला’त मैलापाणी, रासायनिक पदार्थ थेट सोडले जात असल्याचे कबूल केले होते.

धरणांत सोडले जातेय सांडपाणी
धरण क्षेत्रांसह ओढे, नाले तसेच नदीपात्रात अतिक्रमणे केल्याच्या कोणत्याही तक्रारी आमच्याकडे आल्या नाहीत. तक्रार आल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. असे असले तरी वर्षानुवर्षे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी आहेत. अनेक रासायनिक कंपन्याही उभ्या आहेत. धरणांत थेट सांडपाणी, मैलापाणी, रासायनिक पदार्थ सोडले जात असल्याचे गंभीर चित्र दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे.

मच्छी उत्पादनामुळे प्रदूषण वाढले
पानशेत, वरसगाव धरणांच्या पाण्यात मोठमोठी मच्छी उत्पादन केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यासाठी सडलेले मांस, खाद्यपदार्थ धरणांत टाकले जात आहेत. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढून माणसे, जनावरे आजारी पडत असल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने या केंद्रांची क्षमता वाढली आहे.

धनदांडग्यांचा कब्जा
शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या धरणांचे काठच अधिकारी व नेत्यांच्या वरदहस्ताने धनदांडग्यांनी कब्जात घेतले आहेत. तिरालगतचे डोंगर, टेकड्या फोडून पाण्यातच बांधकाम केले आहे. तिन्ही धरणांत मोठमोठी हॉटेल, फार्म हाऊसचे जणू बेट तयार झाले आहे.

तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेल्या सर्व बेकायदेशीर बांधकामांची पाहणी केली जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या जमिनीवर कोठे अतिक्रमण केले आहे याची खात्री केली जाणार आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जाईल.

              – योगेश भंडलकर, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

Back to top button