पावसाने केली रस्त्यांची चाळण; बारामतीच्या पश्चिम भागातील स्थिती | पुढारी

पावसाने केली रस्त्यांची चाळण; बारामतीच्या पश्चिम भागातील स्थिती

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: बारामतीच्या पश्चिम भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यावरील डांबर गायब झाले आहे. ग्रामपंचायतींना जोडणार्‍या रस्त्यांना झाडाझुडपांचा विळखा पडला असून, साइडपट्ट्या खचल्या आहेत.

होळ ते मुरुम, होळ ते कोर्‍हाळे खुर्द आणि होळ ते वडगाव निंबाळकर या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. प्रवाशांना सोयीचा असलेला साळोबावस्ती ते मुरुम या रस्त्याची चाळण झाली आहे. कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असून अनेकजण जखमी झाले आहेत. पाऊस बंद होताच या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

करंजेपूल येथील कारखाना रस्त्यावर मुख्य चौकातच जीवघेणे खड्डे पडले आहेत, तसेच वाणेवाडी येथील चौकातही अशीच परिस्थिती आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होते; मात्र शासनाच्या कोणत्याच विभागाने  रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

सोमेश्वर कारखाना गेट ते वाघळवाडी या मधल्या रस्त्यावर  राडारोडा वाढला असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुरुम, वाणेवाडी, निरा-बारामती रस्ता तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. करंजेपूल ते सोमेश्वर मंदिर या रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

Back to top button