मुळशीत लम्पी स्किन रोगाचा प्रवेश | पुढारी

मुळशीत लम्पी स्किन रोगाचा प्रवेश

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यामध्येदेखील आता लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराने प्रवेश केला आहे. भुकूम येथील एका शेतकर्‍याच्या बैलाला लम्पी स्किन आजार झाल्याचे आढळून आले आहे. मुळशी तालुक्यातील हे पहिलेच प्रकरण असून, पाच किलोमीटरच्या परिघात जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. सचिन भीमराव काळे यांनी दिली.

संबंधित शेतकर्‍याने कोल्हापूर येथून हा बैल विकत आणला होता. आणल्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर तो बैल काहीच खात नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पिरंगुट येथील पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना लक्षणे सांगितल्यानंतर त्यांनी या बैलाच्या विविध आरोग्यविषयक चाचण्या केल्या. पुढील 48 तासांमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर औंध येथील जिल्हा पशू चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. एम. एम. शिंदे, तसेच पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन भीमराव काळे आणि भूगाव येथील पशुधन पर्यवेक्षक गहिनीनाथ बढे यांनी तातडीने या शेतकर्‍याच्या गोठ्याला भेट देऊन त्यांना सर्व माहिती देऊन कशाप्रकारे काळजी घ्यायची, याचे मार्गदर्शन केले. मुळशी तालुक्यामध्ये मुळातच पशुधन कमी असून, आता या लम्पी आजारामुळे आजूबाजूच्या शेतकर्‍यांची झोप उडालेली आहे.

Back to top button