बारामतीच्या जिरायती भागात मुसळधार; शेतकरीवर्गात समाधान | पुढारी

बारामतीच्या जिरायती भागात मुसळधार; शेतकरीवर्गात समाधान

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहर आणि तालुक्यात बुधवारी (दि. 31) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. गणेशाचे आगमनासोबतच आलेल्या पावसामुळे भरण्याच्या प्रतीक्षेत असलेली कर्‍हा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तालुक्यात गाडीखेल येथे तब्बल 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभर तालुक्यात कमालीचा उकाडा जाणवत होता. पावसामुळे उकाड्यापासून बारामतीकरांना दिलासा दिला आहे. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह दोन तास पाऊस झाला.

पावसामुळे वडगाव निंबाळकर येथील ओढ्याला पाणी आले आहे. ग्रामीण भागासह जिरायती भागातही पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पावसाचे पाणी- पाणी झाले होते. सोमेश्वरनगर परिसराला सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढले. बारामती शहर, जिरायती भाग व बागायती पट्ट्याला पावसाने झोडपून काढले. गाडीखेल येथे तब्बल 102 मिलीमीटर अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

या खालोखाल जळगाव कप येथे 78, सायंबाचीवाडी येथे 65, जळगाव सुपे येथे 64 मिलिमीटर नोंद झाली. वडगाव निंबाळकर, सोमेश्वरनगर, चौधरवाडी, वाकी, चोपडज, सोमेश्वर मंदीर, चौधरवाडी, मोरगाव लाटे, होळ, मोढवे, मुर्टी, नारोळी, कार्‍हाटी या भागात पाऊस झाला. पावसामुळे परीसरातील ओढे, नाले, तलाव, विहीरी खळाळून वाहत आहेत.

करंजे, सोरटेवाडी, वडगाव, मुरुम येथील ओढे भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी कडवळ व मका जमिनदोस्त झालेले चित्र होते. गणपती उत्सवात पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, जास्तीचा पाऊस शेतीपिकांसाठी नुकसानकारण ठरण्याची भीतीही शेतकर्‍यांना आहे. चालू पावसाळ्यात प्रथमच कर्‍हा नदीला पूर आला असून, नदीपात्रालगतच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उसाच्या सरीत ठिकठिकाणी साचले पाणी
जिरायती भागाला हुलकावणी दिलेल्या पावसाने खरीप हंगाम अडचणीत आला होता; मात्र गणपतीत पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात उसानंतर सध्या बाजरी आणि सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पावसामुळे उसाच्या सरीत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठले आहे. शेतकरी ते पाणी शेताबाहेर काढून देत आहेत. उन्हाचा तीव्र चटका दिवसभर जाणवत असल्याने पुढील आठवडाभर पावसाची शक्यता आहे.

तालुक्यात बुधवारी झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये
बारामती 22, मोढवे 65, मुर्टी 63, गोजुबावी 62, जराडवस्ती 43, कार्‍हाटी 31, नारोळी 27, चौधरवाडी 31, कटफळ 39, सोनगाव 13, कोव्हीके 11, अंजनगाव 56, चांदगुडेवाडी 52, होळ 28, माळेगाव कारखाना 15, मानाजीनगर 41, बर्‍हाणपूर 59, लाटे 34, मोरगाव 55, लोणी भापकर 59, सुपा 40 आणि उंडवडी कप 42.

Back to top button