पुणे : यंदा दारू, प्लास्टिकमुक्त उत्सव; मानाच्या सात गणपतींचा मोरया कार्यकर्ता मंच स्थापन | पुढारी

पुणे : यंदा दारू, प्लास्टिकमुक्त उत्सव; मानाच्या सात गणपतींचा मोरया कार्यकर्ता मंच स्थापन

पुणे : प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आर्थिकदृष्ट्या रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शहरातील अष्टविनायक मंडळांपैकी सात मंडळांच्या वतीने गणेश कार्यकर्त्यांसाठी ‘मोरया कार्यकर्ता मंच’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘या वर्षीचा गणेशोत्सव दारू व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ अशी माहिती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

मानाच्या सात गणेशोत्सव मंडळांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री कसबा गणपतीचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपतीचे नितीन पंडित, केशव नेऊरगावकर, तुळशीबाग गणपती मंडळाचे विकास पवार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, केसरीवाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन आदी मान्यवर उपस्थित होते.

मानाच्या सात मंडळांनी एकत्रितपणे येऊन मोरया कार्यकर्ता मंचाची स्थापना केली आहे. ‘गणेशोत्सव कार्यकर्ता हा प्रत्येक मंडळाचा गाभा असतो. गणेशोत्सव केवळ 10 दिवसांचा असला, तरीदेखील त्यासाठी कार्यकर्ता वर्षभर झटत असतो. अशा कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोरया मंचाच्या वतीने सुमारे 2 ते 5 लाख रुपयांची कर्ज व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी विविध बँकांसोबत बोलणे सुरू आहे. यातून रोजगार निर्मिती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत खारीचा वाटा उचलण्याचा आमचा मानस आहे,’ अशी भावना सर्व मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

‘पुण्यात निर्माण होते ते देशात, जगात विकले जाते. यापूर्वी पुण्यात गणेश मंडळांनी हौदात गणेश विसर्जन, निर्माल्य संकलन असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत. ज्यांचे अनुकरण इतर ठिकाणीदेखील झाले आहे. शासन, प्रशासन एकत्र येऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने समाजाभिमुख उत्सव अगदी देदिप्यमान होईल, यासाठी पूर्वीपासून प्रयत्न झाले. तीच परंपरा आम्ही पुढे नेत आहोत,’ अशी भावना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी व्यक्त केली.

असा होणार गणेशोत्सव
श्री कसबा गणपती
प्रतिष्ठापना : क्रांतिकारक राजगुरू यांच्या परिवाराच्या हस्ते
आणि यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन.

तांबडी जोगेश्वरी गणपती
प्रतिष्ठापना : मीरा व मिलिंद अनंत काळे, अध्यक्ष कॉसमॉस बँक
देखावा : विविध सणांवर आधारित देखावा, त्यात गुढीपाडवा (2 दिवस), महाशिवरात्र (2 दिवस), वारी (2 दिवस), आषाढी (2 दिवस), दिवाळी (2 दिवस). संवादमाला तिसरे वर्ष : प्रमुख वक्ते : अविनाश धर्माधिकारी, निपुण धर्माधिकारी, आनंद देशपांडे, जनकल्याण समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक आदी.

केसरीवाडा गणपती
उपक्रम : मनोरंजनाचे कार्यक्रम,
8 तारखेला पानसुपारीचा कार्यक्रम
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, प्रतिष्ठापना : चंद्रकांत पाटील
देखावा : स्वामीनारायण मंदिर (अक्षरधाम ) विविध उपक्रमांचे आयोजन.

गुरुजी तालीम गणपती
प्रतिष्ठापना : जान्हवी व पुनीत बालन
उपक्रम : मयूररथ मिरवणूक
गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी :
24 तास सीसीटीव्ही व कार्यकर्ते.

तुळशीबाग गणपती मंडळ
प्रतिष्ठापना : तुळशीबाग चौकात पुनीत बालन यांच्या हस्ते.
उपक्रम : गणेशयाग व अभिषेकची विनामूल्य सेवा.
रोज विविध सेलिब्रिटींच्या हस्ते आरती व त्याचे फेसबुकच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण. सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती, आरोग्य सेवा केंद्र व अ‍ॅम्ब्युलन्स 24 तास उपलब्ध.

अखिल मंडई मंडळ
प्रतिष्ठापना : प्रतापकाका गोगावले
देखावा : स्वप्ननगरी महाल
मंडळाचे आवाहन : भक्तांनी
1 वही-पेन अर्पण करावा, जेणेकरून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ही मदत पोहोचविता येईल.

Back to top button