माळेगावचा ऊसदर म्हणजे सभासदांची फसवणूक | पुढारी

माळेगावचा ऊसदर म्हणजे सभासदांची फसवणूक

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी गाळप हंगाम 2021-22 मधील तुटून आलेल्या उसाला जाहीर केलेला प्रतिटन 3 हजार 100 रुपये हा ऊसदर ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची निव्वळ फसवणूक आहे. सभासदांना कमीत कमी 3 हजार 540 रुपये अंतिम ऊसदर बसत असल्याचा दावा कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. या वेळी दशरथ राऊत, अरविंद बनसोडे, विक्रम कोकरे, अमित जगताप, भारत देवकाते, राजाभाऊ जाधव, पोपट निगडे, अंबादास आटोळे आदी उपस्थित होते.

माळेगाव साखर कारखान्याच्या प्रशासनाने जाहीर केलेला अंतिम ऊसदर 3 हजार 100 रुपये म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची निव्वळ फसवणूक असून गतवर्षीचा झालेला विक्रमी गाळप हंगाम तसेच विक्रमी उपपदार्थ निर्मिती आदींचा विचार करता हिशेबाअंती ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांना कमीत कमी 3 हजार 540 रुपये अंतिम ऊस दर मिळत असल्याचा दावा कष्टकरी शेतकरी समितीने केला आहे. तथापि सभासदांना प्रतिटन 3 हजार 100 रुपये दिलेला ऊसदर अधिकचा असल्याच्या बढाया संचालक मंडळ मारत असल्याचा आरोप समितीने केला आहे.

साखर व्यवसायामध्ये तांत्रिक बाबींचा व उत्पादन खर्चाच्या परिणामांचा सरासरी अभ्यास करून ऑडिट होत असते व त्यावरून ऊसदर ठरतो. या गोष्टीचा संचालक मंडळ विचार करते का नाही, याची शंका आहे. सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यानंतर कष्टकरी शेतकरी समितीला कारखाना व्यवस्थापन चुकीचा कारभार तसेच हिशेबात फेरफार करून सभासदांवर ऊस दराबाबत अन्याय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेपूर्वी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रतिटन 3 हजार 540 रुपये ऊसदर कसा मिळू शकतो, यासाठी जनजागृती करणार असल्याचे कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button