पिंपरी : निवडणुका लांबणीवर पडत असल्यान माजी नगरसेवक वैतागले | पुढारी

पिंपरी : निवडणुका लांबणीवर पडत असल्यान माजी नगरसेवक वैतागले

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका वारंवार पुढे पुढे सरकत आहेत. मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी विविध प्रकाराच्या कार्यक्रमांचा खर्च वाढत आहे. दुसरीकडे, कोरोना महामारीचे निर्बंध हटल्याने सण व उत्सव जोरात साजरे होत असल्याने वर्गणीच्या पावत्यांची संख्या फुगत आहे. खर्चाचे गणित जुळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने माजी नगरसेवक वैतागले आहेत.

फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीतील 128 नगरसेवकांची मुदत 12 मार्च 2022 ला संपली. कोरोना महामारी व ओबीसीचा तिढा यामुळे निवडणुका मुदतीत न झाल्याने महापालिका 12 मार्चला बरखास्त झाली. विविध कारणांमुळे निवडणूक लांबणीवर पडत आहेत. गणेशोत्सव, दिवाळी, वर्षाअखेरीस, पुढील वर्षी, दहावीची परीक्षा झाल्यानंतर निवडणुका होतील, असे नवनवे अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे निवडणुकीची अनिश्चितता कायम आहे. नगरसेवक व पदाधिकारी माजी झाल्याने महापालिकेत पूर्वीप्रमाणे अधिकार राहिलेले नाहीत. प्रशासकीय राजवटीत काही अधिकारी माजी नगरसेवकांना जुमानत नसल्याचे चित्र आहे.

प्रभागातील मतदारांशी संपर्क कायम राहावा तसेच, त्यांना खुश ठेवण्यासाठी सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. संपूर्ण प्रभागात फ्लेक्स लावून प्रसिद्धी केली जात आहे. मतदारांसाठी यात्रा व सहलीचे आयोजन केले जात आहे. क्रीडा, सांस्कृतिक, शालेय स्पर्धा भरविल्या जात आहेत. पक्षाच्या आदेशानुसार प्रभागात कार्यक्रम घ्यावे लागत आहेत. दोन वर्षांच्या निर्बंधानंतर सार्वजनिक मंडळे सक्रिय झाली आहेत. त्यांच्या बोलीनुसार पावत्या फाडाव्या लागत आहेत. खर्च वाढत आहे. मात्र, निवडणुकीचा पत्ता दिसत नसल्याने माजी नगरसेवक चिंताग्रस्त झाले आहेत. खर्च करून ते अक्षरश: वैतागले असून, त्यांची अस्वस्थता वाढली आहे. सामान्य कुटुंबातील माजी नगरसेवक व इच्छुकांचे आर्थिक गणित कोसळले आहे.

मतदारांकडे दुर्लक्ष केल्यास प्रत्यक्ष निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणून इच्छुकांना नाईलास्तव सक्रिय राहावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेऊन मोकळे करा, असे साकडे पक्षश्रेष्ठींना घालण्यात येत आहे. राजकीय पक्ष थंडावले राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करून ठेवले आहे. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होत नसल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सर्वच राजकीय पक्ष थंडावल्याचे शहरातील चित्र आहे. मात्र, शहर पातळीवर राष्ट्रीय सण व उत्सवासंदर्भातील नियोजित कार्यक्रम उत्साहात राबविले जात आहेत.

Back to top button