लोहगाव सात तास अंधारात, ठेकेदाराच्या चुकीबद्दल महावितरणने ठोठावला दीड लाखाचा दंड | पुढारी

लोहगाव सात तास अंधारात, ठेकेदाराच्या चुकीबद्दल महावितरणने ठोठावला दीड लाखाचा दंड

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव-वाघोली रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ठेकेदाराने मुख्य वीजलाईन जेसीबीने तोडल्याने अर्ध्या लोहगावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ठेकेदाराने केबल दुरुस्ती न केल्यामुळे शेवटी महावितरणने केबल जोडल्यानंतर सात तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. ठेकेदाराला 1 लाख 56 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती महावितरण अधिकार्‍यांनी दिली.
लोहगाव- वाघोली रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.

संतनगर येथे पुणे मिठाई दुकानाच्याजवळ रात्रीच्या वेळी खोदाई काम सुरू असताना संतनगरपासून ते डायमंड वॉटर पार्क रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा वीजपुरवठा सोमवारी पहाटे पाचपासून खंडित झाला होता. दुपारी बारानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.
सात तास वीज गायब झाल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास झाला. ठेकेदाराच्या चुकीमुळे वीजपुरवठा खंडित झाला असला, तरी बदनामी मात्र महावितरणची झाली आहे.

सुरुवातीला वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारांशी संपर्क साधला असता ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे दिली. समोर येण्यासदेखील ठेकेदार तयार नव्हता. त्यामुळे महावितरण जॉइन्ट मारून बंद असलेला वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्रीमती ढवळे यांनी लोहगाव पोलिस चौकीत ठेकेदाराविरुद्ध तक्रार करण्यास गेले असता, ठेकेदाराने सुपरवायझरला पाठवून जो काही खर्च आला आहे, तो देण्याचे लेखी मान्य केल्यानंतर महावितरणकडून ठेकेदारास 1 लाख 56 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

Back to top button