Laila Khan Murder Case | 13 वर्षापूर्वी याच बंगल्यात लैला खानसह सहा जणांची झाली होती हत्या, आज झाला खंडहर | पुढारी

Laila Khan Murder Case | 13 वर्षापूर्वी याच बंगल्यात लैला खानसह सहा जणांची झाली होती हत्या, आज झाला खंडहर

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील फार्महाउसवर अभिनेत्री लैला खानसह कुटुंबातील ६ जणांच्या हत्याकांडाने तालुका हादरला होता. अत्यंत क्रूरपणे केलेल्या हत्यांमधील मुख्य आरोपी काश्मिरी नागरीक असलेला परवेझ टाक याला शुक्रवार दि. २४ रोजी मुंबई येथील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या हत्याकांडात परवेझला फाशी होणार की जन्मठेप होणार याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागले होते. या हत्याकांडाला १३ वर्ष झाली असून आजही इगतपुरीतील नागरिक व येथे येणारे पर्यटक लैला खान व तिच्या आईच्या आठवणी काढीत असतात. इगतपुरी तालुक्याच्या निसर्गरम्य परिसर असलेल्या घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीच्या समोर एकांतात असणारा टुमदार बंगला हा अभिनेत्री लैला खान हिचा होता. सन २०११ च्या दरम्यान याच बंगल्यात सहा जणांचे हत्याकांड केले होते. आजच्या सध्याच्या परिस्थीतीत १३ वर्षानंतर हा बंगला खंडहर झाल्याचे पहावयास मिळत आहे. संपूर्ण बंगला भग्नावस्थेत असुन बंगल्याच्या खिडक्या व दरवाजे पुर्णता गायब झाले आहे. (Laila Khan Murder Case)

  • सन २०११ च्या दरम्यान वरील बंगल्यात लैलासह सहा जणांची हत्या झाली. 
  • 24 मे 2024 रोजी न्यायालयाने मुख्य आरोपी परवेझला अखेर फाशीची शिक्षा सुनावली आहे.
  • त्याचा साथीदार शाकिर हा अजून फरार आहे.
  • ज्या बंगल्यात हे हत्याकांड घडलं तो बंगला आजच्या अवस्थेत खंडहर झाला आहे.

कन्नड फिल्म मधून सन २००२ मध्ये “मेकअप ” आर्टिस्ट म्हणून लैला खान हिने सिने सृष्टीत पदार्पण केले होते.  हिंदी चित्रपट सृष्टीत राजेश खन्ना यांच्या सोबत “वफा ए डेडली लव्ह स्टोरी” मुख्य चित्रपटात तीने भुमिका केली होती. मात्र हा चित्रपट पुढे चालला नाही. लैला खानची आई सेलिना हिने तीन लग्न केली होती. नादिर शाह पटेल हा लैला खानचा पिता सेलिनाचा पहिला नवरा होता. दुसरा नवरा बंगळूरु येथील आसिफ शेख होता. तर तिसरा नवरा (ज्याने हे हत्याकांड घडविले तो ) काश्मीरमधील परवेझ टाक हा होता. सेलिना हिच्या मोकळ्या स्वभावामुळे अनेक लोकांशी तिचे नाव जोडले गेले होते. लैला खान व तिचा परिवार मुंबईत कमी आणि इगतपुरीतील फार्महाऊसवर जास्त असायचा. इगतपुरी शहरात लैला किंवा सेलिना या कायम विविध दुकानांवर खरेदी साठी येत असत. व्यवहाराला चोख असलेली सेलिना व लैलाच्या आठवणी आजही इगतपुरीकरांच्या स्मरणात आहेत. (Laila Khan Murder Case)

आधी बेशुद्धीचे औषध दिलं नंतर झाडल्या गोळ्या (Laila Khan Murder Case)

या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेला परवेझने वेळोवेळी जबानी बदलली आहे. त्याने जबानीत त्या दिवशीची हकीकत कथन केली. त्यादिवशी परवेज व सेलिना ( लैलाची आई ) या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. सेलिना हिला दुबईला स्थायिक व्हायचे होते. सर्व मालमत्ता विकून दुबईला जाण्याचा प्लॅन आखला होता. लैला खान हिच्या ‘जिन्नत’ चित्रपटाचे शूटिंगसाठी मुंबईहून कुटुंबियांसह इगतपुरीच्या फार्महाऊसवर आली आणि तेथेच तिचा अंत झाला. इगतपुरीच्या फार्महाऊसवर ९ फेब्रुवारी २०११ च्या रात्री लैलाचा सावत्र पिता व मुख्य आरोपी परवेज टाक व त्याचा साथीदार शाकिर हा अजून फरार आहे. या दोघांनी लैला खान, ३० वर्ष, तिची आई सेलिना पटेल, ५१ वर्ष, बहीण झारा ,२५ वर्ष, भाऊ इम्रान , २५ वर्ष, आझिमा , ३२ वर्ष, लैला खानची नातेवाईक रेश्मा सगीर खान, १९ वर्ष या सगळ्यांना जेवनात बेशुद्धीचे औषध टाकून मग एका पाठोपाठ गोळ्या झाडून व डोक्यात लोखंडी रॉडने मारून अमानुष हत्या केली. त्यानंतर बंगल्याच्या आवारातच त्यांना खड्डे करून गाडण्यात आले होते. तसेच बंगला उध्वस्त करून त्याला काही ठिकाणी आग लावण्यात आली होती. हे हत्याकांड घडवून परवेझ व त्याचा साथीदार शाकिर हुसेन हे पसार झाले होते.

कसा झाला या हत्याकांडाचा उलगडा ?

हा सर्व प्रकार प्रॉपर्टीच्या वादात भांडण होत होती. परवेझला सेलिना कायम अपमानित करत होती. त्यातूनच तिला रागाच्या भरात ठार केले. सेलिनाचा खून करतांना लैलाने बघितले. त्यामुळे लैलाला संपवावे लागले. एकामागून एक पुरावे नष्ट करण्यासाठी ६ जणांना ठार केल्याचा कबुली जबाब परवेझ ने दिला आहे. हत्याकांडानंतर परवेझ हा जम्मू काश्मीर येथे पळून गेला होता. परवेझवर काश्मीर येथेही काही गुन्हे होते. अश्याच ऐका गुन्ह्याच्या तपासात जम्मू काश्मीर किश्तवाड़ पोलिसांनी परवेझला अटक केली. तेव्हा त्यावेळी तपासात लैला खान हत्याकांडाचाखुलासा झाला. तत्कालीन पोलीसअधीक्षक हिमांशू राय यांनी या तपासाची चक्रे फिरवून मोठे हत्याकांडाचा उलगडा झाला. त्यावेळी लैला खानचे वडील नादिर शाह पटेल यांनी लैला खान व परिवार गायब असल्याची तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा –

Back to top button