शहीद जवान अंकुश वाहुळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आईने फोडला टाहो | पुढारी

शहीद जवान अंकुश वाहुळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आईने फोडला टाहो

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील वीर जवान अंकुश वाहुळकर यांच्या पार्थिवावर आज (दि.24) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवान अंकुश अमर रहे, भारत माता की जय घोषणा देत पंचक्रोशीतील ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

सिक्‍कीम येथे कर्तव्यावर असताना 22 मे रोजी झालेल्या अपघातात वीरमरण आलेल्या जवान अंकुश वाहुळकर यांचे पार्थिवदेह आज पहाटे 5 वाजता गुंज गावात आणण्यात आले. त्यांना पाहून आई, वडील, भाऊ, बहिण, नातेवाईक ग्रामस्थांच्या अश्रुंचा बांध फुटला.

सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा वाहुळकर यांच्या शेतापर्यंत काढण्यात आली. अंकुश यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. विशेष पोलीस पथकाने बिगुल वाजवून सलामी दिली व आकाशात बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या. त्यानंतर वडील एकनाथ वाहुळकर व भाऊ शिवानंद वाहुळकर यांनी वीर जवान अंकूश वाहुळकर यांच्या चितेला अग्नी दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. अंकुश वाहुळकर यांच्या वीर मरणाने गुंज गावावर शोककळा पसरली.

Back to top button