पुणे : 12 हजार 253 जणांना प्रवेश जाहीर; चार हजार 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय | पुढारी

पुणे : 12 हजार 253 जणांना प्रवेश जाहीर; चार हजार 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसर्‍या फेरीत 12 हजार 253 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. चार हजार 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 24 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. महाविद्यालयांमध्ये 1 लाख 9 हजार 790 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 86 हजार 429 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत.

प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत दोन नियमित फेर्‍या राबवण्यात आल्या. प्रवेश प्रक्रियेच्या तिसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश सोमवारी जाहीर करण्यात आले. तिसर्‍या फेरीत 4 हजार 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, 2 हजार 370 विद्यार्थ्यांना दुसर्‍या पसंतीचे, तर 1 हजार 524 विद्यार्थ्यांना तिसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. एकूण 12 हजार 253 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला.

त्यात 1 हजार 234 विद्यार्थ्यांना कला शाखेत, 4 हजार 676 विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत, 6 हजार 110 विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत आणि 233 विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत प्रवेश मिळाला. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेशाची प्रक्रिया 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागेल. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी करून घेतले जाणार नाही. चौथ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया 25 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

Back to top button