सांगवी परिसरात गणेशमूर्तींचे स्टॉल सजले | पुढारी

सांगवी परिसरात गणेशमूर्तींचे स्टॉल सजले

दापोडी : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे सांगवी, दापोडी परिसरात गणेशमूर्तीचे स्टॉल ठिकठिकाणी लावलेले दिसत आहेत. यावर्षी फेटा परिधान केलेला, शिंपल्यावरील, विविध फुले आणि प्राण्यांवर विराजमान असलेल्या मूर्तींना मोठ्या
प्रमाणात मागणी असल्याचे दिसत आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी उपनगरी आतुरली आहे. यंदा सर्वच निर्बंध शिथिल झाल्याने गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव जसाजसा जवळ येऊ लागला आहे, तस तशी कारागिरांची धावपळ होत असून मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे.

परिसरातील कारागीर पाच इंचापासून 90 फुटांपर्यंतच्या मूर्तींना शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. मूर्तिकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. विक्रीसाठी बहुतांश मूर्ती तयार झाली असून, बुकिंगही झाले आहेत. सर्वच कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर होत आहे.

कच्च्या मालाचे सातत्याने वाढलेले भाव, वाढती महागाई यामुळे पाच वर्षांत मूर्तींचे भाव दुप्पट झाले आहेत. याचाच फटका गणेश भक्तांना बसत आहे. पाच वर्षांपूर्वी चारशे रुपयांत मिळणारी मूर्ती यावर्षी 800 ते हजार रुपयांत मिळत आहे. सध्या मूर्ती बनविणार्‍या कारागिरांची संख्या कमी झाली आहे. राज्यात व शहरातही संख्या खूप कमी झाल्यामुळे मूर्तिकारांना परराज्यातून कारागीर बोलावे लागतात. या सर्व गोष्टीमुळे कुशल मजुरांच्या मजुरीत खूप मोठी वाढ झाली आहे.

प्रामुख्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणवती, लालबागचा गणपती व सांगवीचा राजा या मूर्तींना मोठी मागणी आहे. मूर्तीमध्ये जवळजवळ 50 हून अधिक विविध प्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणार्‍या विविध घटनांचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून, मूर्ती निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

रंगकामाला आला वेग
यंदा मूर्तीच्या किमतीमध्ये 25 ते 30 टक्के वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असणार्‍या पेन व हमरापूर येथून मोठ्या प्रमाणावर कच्च्या मूर्ती आणून त्यावर रंगकाम व इतर कलाकुसर केली जाते. जुलैच्या सुरुवातीपासून मूर्तीच्या रंग कामाला सुरुवात होते. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशोत्सव लवकर असल्याने सर्वच कारखान्यांमध्ये रंगकाम वेगाने सुरू आहे.

यंदा विविध रंगाच्या, वाहतूक आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीही वाढल्या आहेत. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यांतून मूर्ती निर्मितीसाठी लागणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिस, काथ्या, रंग आदी कच्च्या मालाची आयात केली जाते. या कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने व इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च तिपटीने वाढल्याने मूर्तिकारांना खर्च मोठा व उत्पन्नात तोटा झाल्याने महागाईचा दणका बसला आहे. या विविध गोष्टीमुळे मूर्तिकारांना महागाईचा फटका बसत आहे.
                                              – रवींद्र चित्ते, मूर्तिकार, पिंपळे गुरव

 

Back to top button