आंद्रा धरणात विनाप्रक्रिया रसायनयुक्त सांडपाणी, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

आंद्रा धरणात विनाप्रक्रिया रसायनयुक्त सांडपाणी, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : टाकवे जवळील राजपुरी रस्त्याजवळ आंद्रा धरणालगतच्या फूल उत्पादक कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता रसायनयुक्त सांडपाणी आंद्रा धरणात बेधडकपणे सोडले जात आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण
झाला आहे. आंद्रा धरणांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा साधारणत: नऊ हजार लोकसंख्या असलेल्या टाकवे बुद्रुक या गावाला होतो. परिसरातील फळणे, बेलज, राजपुरी, माऊ, गभलवाडी, कोंडीवडे, भोयरे, कल्हाट, निगडे, आंबळे, मंगरूळ इत्यादी गावातील लोक पिण्यासाठी पाण्याचा उपयोग करत असून शासनाच्या आदेशानुसार तीर्थक्षेत्र आळंदी,देहू येथे यात्रा काळात पाणी सोडले जात आहे.
धरणांमध्ये सोएक्स फ्लोरा कंपनीचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सरळ मिसळत असल्यामुळे परिसरातील गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परिणामी संबंधित कंपनी जे सांडपाणी धरणामध्ये सोडत आहेत ते तातडीने बंद करावे. येत्या पंधरा दिवसांमध्ये सदर कंपनीने धरणांमध्ये सांडपाणी सोडण्याचे बंद न केल्यास कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा टाकवे ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात सोएक्स फ्लोरा कंपनीच्या व्यवस्थापिका पूनम कोटीन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास
नकार दिला.

कंपनीचा कर मोठ्या प्रमाणात थकीत आहे त्यामुळे गावातील विकासकामांना बाधा निर्माण होत आहे; तसेच ग्रामपंचायतीमध्ये नोंद केलेल्या बांधकामापेक्षा कंपनीने अधिक जागेत अनधिकृतपणे बांधकाम केले असून, या संदर्भात सदर कंपनीस नोटीस काढून पुढील महिन्यांमध्ये त्यांच्यावरती जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
                                                       -सुभाष बांगर, ग्राम विकास अधिकारी

सोएक्स फ्लोअरा कंपनी फुल उत्पादक म्हणून ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे; मात्र फूल उत्पादकच्या नावाखाली या कंपनीमध्ये इतर उद्योग सुरु आहेत. दर आठवड्यातून गुरुवार व शुक्रवारी रात्रीच्या वेळी मालाचे कंटेनर विना चलन नेले जात आहेत. या कंपनीविरोधात अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे; मात्र वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे सदर कंपनीवरती काहीही परिणाम होत नाही.
                                                -विश्वनाथ असवले, ग्रामपंचायत सदस्य

 

Back to top button