पुणे : आरोग्यसेवाच ‘सलाइन’वर! | पुढारी

पुणे : आरोग्यसेवाच ‘सलाइन’वर!

देऊळगावराजे, पुढारी वृत्तसेवा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आरोग्य केंद्रातील लिपिक तब्बल नऊ महिन्यांपासून कामावरच येत नसून एक आरोग्यसेविकाही सहा महिन्यांपासून अनुपस्थित आहे. विविध असुविधांचा सामना करावा लागत असल्याने आरोग्य केंद्रच सलाइनवर असल्याचे नागरिकांनी उपरोधिकपणे सांगितले.

आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा आहेत. परंतु, एकच अधिकारी सध्या कामकाज सांभाळत आहे. शिपाईपदही रिक्त आहे. काही कर्मचारी काम संपले की चार-पाच वाजता निघून जातात. विशेष म्हणजे, ही सर्व परिस्थिती लेखी स्वरूपात दीड महिन्यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना कळविली आहे. मात्र, अद्यापही दखल घेण्यात आली नाही.

पावसामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागात थंडी, ताप, खोकला व सर्दी आदी आजारांची साथ सुरू आहे. यामुळे नागरिकांसह लहान मुले साथीच्या आजाराने हैराण झाले आहेत. मात्र, या आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी असल्याने आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. आरोग्य केंद्राकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात अनेक प्रकारे मतभेद होत आहेत. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे आरोग्य केंद्रातील एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याबरोबर पथक असल्याने मी नंतर आपल्याशी बोलते, असे त्यांनी सांगितले.

देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रामधील काही आरोग्यसेविका, लिपिक आणि परिचारिका या अनेकवेळा उपस्थित नसताना देखील पगार घेत आहेत. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही.

                                                     – अमित गिरमकर, माजी सरपंच, देऊळगाव राजे

Back to top button