धरणक्षेत्रात दमदार ! पानशेत भरण्याच्या मार्गावर | पुढारी

धरणक्षेत्रात दमदार ! पानशेत भरण्याच्या मार्गावर

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सायंकाळपासून पानशेत व मुठा खोर्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीत गेल्या 24 तासांत तब्बल दीड टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची वाढ झाली आहे. पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असून, मंगळवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेतमध्ये 89.54 टक्के पाणीसाठा झाला होता. खडकवासला धरणसाखळीत 23.08 टीएमसी म्हणजे 79.18 टक्के इतका पाणीसाठा झाला होता.

सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 21.54 टीएमसी पाणी होते. सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 35 तासांत टेमघर येथे 195 मिलिमीटर पाऊस पडला. तर याच कालावधीत पानशेत येथे 115, वरसगाव येथे 116 व खडकवासला येथे फक्त 14 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला भागापेक्षा दहा पट अधिक पाऊस मुठा- पानशेत भागात कोसळत आहे. मंगळवारी सकाळपासून मुठा, टेमघरसह रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात पावसाची संततधार आहे. तव, दापसरे, शिरकोली भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सिंहगड भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जोरदार सरी कोसळत आहेत.

शहरात सलग दुसर्‍या दिवशी पाऊस
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड भागात सलग दुसर्‍या दिवशी पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ थांबलेल्या पावसाने दोन दिवसांपासून आगमन केले. दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. वाहतुकीची काही भागात कोंडी झाली होती. मात्र, हळूहळू ही कोंडी कमी होत गेली. दरम्यान पावसामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते. दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत शहरातील पाऊस हळूहळू कमी होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पुणे शहरात-17.2 मि.मी., पाषाण- 17.8 मि.मी., लोहगाव-15.6 मि.मी., चिंचवड- 33.5 मि.मी., लवळे-13 मि.मी. आणि मगरपट्टा-3 मि.मी. पाऊस पडला.

धरण पाऊस (मि.मी.) टक्केवारी(टीएमसी)
खडकवासला 8 44.50-1.92
पानशेत 40 89.54- 10.82
वरसगाव 42 80.47- 12.85
टेमघर 70 63.43- 3.71

Back to top button