पुणे : गणेश मंडळांना मिळणार पाच वर्षांचा परवाना | पुढारी

पुणे : गणेश मंडळांना मिळणार पाच वर्षांचा परवाना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून शहरातील गणेश मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच नि:शुल्क परवाना दिला जाणार आहे. याबाबतची घोषणा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंडळांचे कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या बैठकीत केली. दरम्यान, शहरांतील गणेशोत्सव हा केवळ ठरावीक मंडळच साजरे करीत नाहीत, त्यामुळे गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत सर्वांनाच सारखी वागणूक द्यावी, अशी मागणी या वेळी पूर्व भागातील व उपनगरांमधील कार्यकर्त्यांनी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलिस आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांची सोमवारी महापालिकेत संयुक्त बैठक झाली.

या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे, वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व विलास कानडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांच्यासह अन्य अधिकारी आणि मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
टिळक रस्त्यावरूनही मोठ्या संख्येने गणपती विसर्जन होते.

त्यामुळे पालिकेने या रस्त्याकडेही लक्ष द्यावे, गणेशोत्सव कार्यकर्ते, बाहेरगावातून येणारे प्रेक्षक यांची सोय व्हावी, यासाठी रात्री हॉटेल, खाणावळी सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, रात्री बारापर्यंत स्पीकर वाजविण्यासाठी पाच दिवस परवानगी द्यावी, पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था, बॉक्स कमानी, जाहिरातींवर मर्यादा नको, मेट्रोच्या कामामुळे बंडगार्डन येथील विसर्जन घाटावर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे पालिकेने लक्ष द्यावे, तसेच शेजारील उद्यानात विसर्जन हौदांची सोय करावी, तसेच फिरत्या विसर्जन हौदांची संख्या वाढवावी, अशा मागण्या यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या.

पालिका व अन्य यंत्रणांकडून मानाच्या गणपतींना जसा मान दिला जातो, तसाच मान इतर मंडळांनाही दिला जात नाही. दरवर्षी गणेशोत्सवात शिवाजी रस्त्यावर बॅरिकेडिंग केले जाते. शनिवारवाड्यापासून निघालेल्या नागरिकांना थेट स्वारगेटला बाहेर पडावे लागते. त्यामुळे पूर्व भागातील मंडळांकडे कोणी येत नाहीत. हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि सर्व मंडळांना समान वागणूक द्यावी, अशी मागणी पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी केली.

इमेट्रोच्या कामावर अनेकांची नाराजी : कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम केले गेले. या मेट्रो स्थानकाची उंची आणि गणेश विसर्जन रथाची उंची, रुंदी याचा विचार न करता प्रशासनाने काम केले आहे. याचे नियोजन करताना तत्कालीन नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले. कर्वे रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणार्‍या कोथरूड, कर्वेनगर भागातील गणेश मंडळांना आता त्यांच्या गणेश विसर्जन रथाची उंची आणि रुंदी किती असावी आणि त्यांचा मार्ग कोणता असावा याची माहिती लवकर कळवा, एखाद्या मंडळाच्या रथाची उंची आणि रुंदी जास्त झाली तर विसर्जन मिरवणुक रखडू शकते. खंडोजीबाबा चौक येथील मेट्रो पुलामुळे विसर्जन मिरवणुकीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या मेट्रोच्या पुलाचा विचार करावा. तसेच मंडई, स्वारगेट, पुणे स्टेशन, बंडगार्डन आदी भागातील मेट्रोची कामे लवकर पुर्ण करून मिरवणुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत मेट्रोच्या कामावर नाराजी व्यक्त केली.

गणेशोत्सव साजरा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वादविवाद होणार नाही, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा तपासणी शक्य व्हावी, यासाठी बॉक्स कमानी उभारताना खालील भाग मोकळा ठेवावा. मेट्रोसंदर्भात मेट्रोच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली जाईल. पार्किंग, बॅरिकेडिंग, मिरवणुकीसाठीचे क्रमांक याबाबत योग्य नियोजन केले जाईल.
                                                   – राजेंद्र डहाळे, अप्पर पोलिस आयुक्त.

कोरोनामुळे दोन वर्षे साजरा न झालेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होईल. पालिकेतर्फे सर्व मंडळांना पाच वर्षांसाठी एकदम व विनाशुल्क परवाने दिले जातील. गणेशोत्सवात तीनऐवजी चार दिवस रात्री बारापर्यंत स्पीकर सुरू ठेवता येतील. न्यायालयाच्या आदेशांनुसार यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. मेट्रोच्या कामासंदर्भात तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच गतवर्षीच्या तुलनेत फिरत्या विसर्जन हौदांची संख्या दुपटीने वाढवून 200 हौद उपलब्ध केले जातील. अन्य अडचणींसंदर्भात मी स्वतः जागेवर पाहणी करेन.
                                                               – विक्रम कुमार, आयुक्त.

Back to top button