सोमेश्वरनगरला बाजरी फुलोर्‍यात | पुढारी

सोमेश्वरनगरला बाजरी फुलोर्‍यात

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या पश्चिम भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे बाजरीचे पीक सध्या फुलोर्‍यात येऊ लागले आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीनचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले आहे. या दोन्हीही पिकांतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा बळिराजाला आहे. सोमेश्वरनगर परिसरातील नीरा डावा कालवा आणि नदीच्या पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे. सध्या मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा होत आहे. या भागातील हजारो एकरावर ऊस लागवड केली जाते.

तसेच खरिपाची पिकेही घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. शेकडो एकरावर जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसावर बाजरी आणि सोयाबीनचे पीक यंदा शेतकर्‍यांनी घेतले आहे. काही ठिकाणी उसाच्या शेतात सोयाबीनचे आंतरपीकही शेतकर्‍यांनी घेतले आहे.
मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, करंजे, करंजेपूल निंबूत, होळ, चौधरवाडी, सोमेश्वर मंदिर परिसर, वाकी आदी भागातील शेतकर्‍यांनी बाजरी, सोयाबीनसह तरकारी पिके घेतली आहेत.

सुरुवातीला झालेल्या संततधार पावसाने बाजरी आणि सोयाबीनचे पीक जोमात वाढले आहे. हजारो एकरावर उसाच्या लागवडीचे क्षेत्र पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शेतात कुटुंबाला खाण्यासाठी धान्य उपलब्ध होण्यासाठी बाजरीचे पीक घेतले आहे. सोयाबीनला राज्य सरकारने हमीभाव जाहीर केला असल्याने उसासह सोयाबीनमधूनही शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

टोमॅटो उत्पादकांना लॉटरी
कोरोनामुळे दोन वर्षे टोमॅटो उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. मात्र, चालू वर्षी टोमॅटो उत्पादकांना चांगला भाव मिळाल्याने त्यांना लॉटरी लागली. दोडका, वांगी, कारली, भोपळा, कोथिंबीर, कोबी आदी तरकारी पिकेही जोमदार आली असून, या पिकांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. बाजरी आणि सोयाबीनला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Back to top button