आसखेड खुर्द परिसरातील बिबट्या पकडण्याची मागणी | पुढारी

आसखेड खुर्द परिसरातील बिबट्या पकडण्याची मागणी

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : आसखेड खुर्द गावच्या परिसरात बिबट्याच्या सततच्या दर्शनाने आणि पशुधनावर झालेल्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीपोटी शेतमजूरवर्ग शेतात काम करण्यास धजावत आहेत. पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

आसखेड खुर्दचे शेतकरी विलास नामदेव लिंभोरे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने म्हैस, पारडी यांच्यावर हल्ला केल्याची घटना (दि.2) रोजी रात्री घडली होती. आसखेड खुर्द व बुद्रुक या दोन गावात बिबट्या व लांडग्याच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आसखेड खुर्दमध्ये 19 जुलै व बुद्रुकला 23 जुलै रोजी शेतकर्‍यांच्या जनावरांवर बिबट्या व लांडग्यांनी हल्ले केले होते. या दोन घटना ताज्या असतानाच मंगळवारी (दि. 2) विलास लिंभोरे यांचे गोठ्यात बांधलेल्या म्हैस व पारडावर बिबट्याने रात्री हल्ला करून जखमी केले. अ‍ॅड. बाळासाहेब लिंभोरे यांच्या घराचे काम बिबट्याच्या भीतीने रखडले आहे.

बिबट्याच्या त्रासाने शेतकरीवर्ग अक्षरशः भयभीत झाला आहे. आसखेड गावात बिबट्या व लांडग्याच्या हल्ल्याच्या घटना घडूनही वन विभागाकडून अद्यापही कार्यवाही झालेली नाही.भीतीपोटी शेतमजूर शेतात काम करण्यास नकार देत असून पिकांत तण वाढले आहे. दोन्ही गावांच्या परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याला लपायला वाव आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी सरपंच प्राची लिंभोरे यांनी केली आहे.

Back to top button