धक्कादायक! ईव्हीएमवरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद; शिरूर मतदारसंघामधील प्रकार | पुढारी

धक्कादायक! ईव्हीएमवरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद; शिरूर मतदारसंघामधील प्रकार

पुणे : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती, कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सीसीटीव्हीचा डिस्प्ले पुन्हा सुरू करण्यात आला.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही सुमारे पाऊण तास बंद पडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधींनी केला होता. तर सुळे यांनी अशा महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असणे संशयास्पद असल्याचा आरोप केला. हा प्रक्रार निष्काळजीपणाचा असल्याचा आरोप करत तक्रार केल्यानंतर संबंधिताकडून योग्य उत्तर मिळाले नसल्याचेही सांगितले होते. हा प्रकार गंभीर असून केंद्रीय निवडणूक आयोगाने यात तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी केवळ डिस्प्ले बंद असल्याचे सांगितले होते. असाच प्रकार शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या कारेगाव गोदामातही घडला.

उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी सीसीटीव्हीमधील चित्रण बघण्यासाठी डिस्प्लेची व्यवस्था करण्यात येते. परंतु, शिरूर लोकसभेच्या उमेदवारांचे प्रतिनिधीच उपस्थित नसल्याने डिस्प्ले बंद केला. परंतु, ही बाब वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने डिस्प्ले सुरू करण्यास सांगितले. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांना सर्व माहिती देण्यात आली. उमेदवारांचे प्रतिनिधी आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत पुन्हा डिस्प्ले सुरू करण्यात आला. दरम्यान, गोदामातील सीसीटीव्ही सुरूच होते. केवळ डिस्प्ले बंद होता, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button