सीएनजी दराचा पुन्हा भडका; पुणे जिल्ह्यात सीएनजी 91 रुपये प्रतिकिलो | पुढारी

सीएनजी दराचा पुन्हा भडका; पुणे जिल्ह्यात सीएनजी 91 रुपये प्रतिकिलो

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एमएनजीएल प्रशासनाने जुलै महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ केल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ केली आहे. सीएनजीचा दर आता 85 रुपयांवरून थेट 91 रुपये झाला आहे. तब्बल 6 रुपयांनी वाढ झाल्यामुळे रिक्षाचालक नाराज झाले आहेत. ही दरवाढ बुधवार (दि. 3) मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण भागात लागू होईल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणजेच एमएनजीएलमार्फत पुरवठा होणार्‍या सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात एमएनजीएलने 6 जुलै 2022 च्या मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या भागात 3 रुपयांनी दरवाढ लागू केली होती.

तेव्हा सीएनजी 82 रुपये प्रति किलो मिळत होता. वाढ झाल्यावर तो 85 रुपयांनी मिळू लागला. आता महिन्याभरातच एमएनजीएल प्रशासनाने डोमेस्टिक नैसर्गिक वायूच्या इनपूट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजीच्या किमतीत 6 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सीएनजी 91 रुपयांना मिळणार आहे. सीएनजीवर सर्वाधिक रिक्षाचालक आणि पीएमपीच्या बस अवलंबून आहेत. सीएनजी वाढल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ते भाडेवाढ करण्याची मागणी करत आहेत.

पीएनजी मिळणार 51.50 रुपयांना
प्रशासनाने घरगुती वापरासाठी उपयोगात येणार्‍या पीएनजीच्या दरातही वाढ केली आहे. हा गॅस नागरिकांना 51 रुपये 50 पैसे प्रतिकिलो दराने मिळणार आहे.

खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा
सीएनजीच्या सतत होणार्‍या दरवाढीचा रिक्षा पंचायतकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या दरवाढ विरोधी तीव्र भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायतीकडून खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयावर 9 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली. या वेळी रिक्षा पंचायचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव देखील रिक्षाचालकांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी होणार आहेत. शहरातील सर्व रिक्षाचालकांनी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रिक्षा बंद ठेवून मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रिक्षापंचायतीकडून करण्यात आले आहे.

Back to top button