पुणे : बसची थेट सेवा उपलब्ध करा, थेट बसगाड्या सुरू करण्याची मागणी | पुढारी

पुणे : बसची थेट सेवा उपलब्ध करा, थेट बसगाड्या सुरू करण्याची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीने बाजीराव रस्त्यावरून मोठ्या बस बंद केल्या, या निर्णयाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मात्र, छोटी बस असो किंवा मोठी बस असो, यापैकी कोणत्याही बसद्वारे आम्हाला कात्रज ते शिवाजीनगर जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी पीएमपीचे प्रवासी रवींद्र मेंगडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केली. पीएमपी प्रशासनाने मध्यवस्तीतील बाजीराव आणि शिवाजी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने मोठ्या बसगाड्या या मार्गावरून बंद केल्या आहेत.

त्यामुळे मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, वाहनचालक खूश झाले आहेत. मात्र, पीएमपीचे प्रवासी नाराज झाले आहेत. या मार्गावरील बस बंद केल्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांना कात्रजवरून शिवाजीनगरला किंवा मध्यवस्तीमध्ये असलेल्या शाळेमध्ये किंवा बाजारपेठेत जायचे असेल, तर बस बदलावी लागत आहे. तसेच, बस बदलावी लागत असल्याने प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून, थेट बसगाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘पुण्यदशम’मध्ये वाढ करावी
स्वारगेट चौकात ‘पुण्यदशम’ च्या 7 मीटर लांबीच्या बस दोन मिनिटाला उपलब्ध होत आहेत. मात्र, या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत त्या अपुर्‍या पडत आहेत. हे ‘पुढारी’च्या पाहणीत सोमवारी समोर आले आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वारगेट येथे पीएमपीच्या पुण्यदशम गाड्यांमध्ये वाढ करावी आणि या गाड्या मध्यवस्तीतून जाणार्‍या सर्व मार्गांवर थेट चालवाव्यात. जेणेकरून प्रवाशांना गाडी बदलायचा आणि तिकिटासाठी अतिरिक्त पैसे देण्याचा त्रास होणार नाही.

 

दररोज बसने अप्पर-इंदिरानगर येथून शनिवार पेठेत हुजूरपागा कॉलेजला यावे लागते. पूर्वी अप्पर येथून थेट बस होती. आता मात्र स्वारगेट येथे बस बदलावी लागत आहे. बस बदलण्याचा आणि स्वारगेट येथून दुसर्‍या तिकिटासाठी पैसे भरण्याचा त्रास वाढला आहे. त्यामुळे आम्हाला बस छोटी असो की मोठी, काही फरक पडणार नाही. फक्त थेट मिळावी.
– ऐश्वर्या कदम, विद्यार्थिनी, अप्पर-इंदिरानगर

 

कात्रज येथून कामानिमित्त दररोज शिवाजीनगरला जावे लागते. पूर्वी कमी तिकीटदरात बस न बदलता शिवाजीनगरला जात होतो. आता स्वारगेटला बस बदलावी लागत आहे आणि दुसरे तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे आमचे जास्त पैसे जातात. ‘पीएमपी’ने आम्हाला
थेट बससेवा उपलब्ध करून द्यावी.
– अजय रणपिसे, प्रवासी, कात्रज

Back to top button