पिंपरी : स्वस्त दरामुळे पोस्टल लाइफ इन्शुरन्सकडे वळताहेत ग्राहक | पुढारी

पिंपरी : स्वस्त दरामुळे पोस्टल लाइफ इन्शुरन्सकडे वळताहेत ग्राहक

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी: सरकारी, निमसरकारी कर्मचारी, खासगी शिक्षण संस्थांचे कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कन्सल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, बँकर्स, कर्मचार्‍यांसाठी भारतीय डाक विभागाच्या वतीने पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजना राबविण्यात येत असून या योजनेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर विम्याच्या महागड्या दरामुळे पोस्टल लाइफ इन्शुरन्स सरस ठरतोय. गेल्या चार महिन्यांत शहरातील 160 नागरिकांनी पोस्टल विमा उतरवला आहे.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पोस्ट खात्याने कात टाकली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. सन 2016 पासून ऑनलाईन व्यवहारांसाठी पोस्टाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू केली आहे. कोरोना काळात सर्व काही ठप्प झाले असताना पोस्टाने खूप चांगली सेवा दिली. पोस्ट खाते आणि टाटा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेली वर्षाला 399 रुपये भरून दहा लाखाचा अपघात विमा चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेकडेही ग्राहक वळत आहेत.

वय वर्षे 19 ते 55 वर्षांपर्यंतच्या कर्मचार्‍यांना, तसेच डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रबंधन कन्सल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक, बँकर्स यांना या विमा योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे कशाही प्रकारे मृत्यू झाल्यास नॉमिनीला इन्शुरन्स क्लेम मिळतो.
पॉलिसीधारकाला कलम 80 सी अंतर्गत करात सवलत मिळते. या योजनेचा सर्वात जास्त बोनस रेट असून तो 52% आहे. सहा महिन्याचा किंवा वार्षिक हप्ता एकदम अ‍ॅडव्हान्समध्ये भरल्यास एक टक्का ते दोन टक्के सूट दिली जाते. बचत व विमा या दोन्ही गोष्टी या पॉलिसीतून मिळतात. विमाधारकाला कर्ज सुविधाही उपलब्ध होते. विमा पॉलिसीचा हप्ता भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ऑनलाईनही भरता येतो. ग्राहकाला पासबुक व पॉलिसी बॉण्ड दिला जातो.

डाक जीवन विमा पॉलिसी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
संस्थेचे आय कार्ड/ पेमेंट स्लिप
डिग्री सर्टिफिकेट
फोटो

कशाही प्रकारे विमाधारकाचा मृत्यू झाला तरी नॉमिनीला इन्शुरन्स क्लेम मिळत असल्याने तसेच सर्वात जास्त बोनस रेट 52% असल्याने पोस्टल लाइफ इन्शुरन्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेल्या चार महिन्यात पिंपरी चिंचवड शहरातील 160 लोकांनी ही विमा पॉलिसी उतरवली आहे.

                                 -के. एस. पारखी, जनसंपर्क अधिकारी पोस्ट खाते

Back to top button